

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांमध्ये कुणबी-मराठा नोंदींचा शोध घेतला जात आहे. त्यानुसार आजपर्यंत ८३ लाख ६४ हजार ८६५ नोंदीची पडताळणी केली असता त्यामध्ये कुणबीच्या १ लाख ४३ हजार ९५६ नोंदी आढळून आल्या आहेत.
राज्य शासनाच्या आदेशानुसार आणि निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात मराठा-कुणबी तसेच कुणबी-कराठा नोंदीचा शोध घेण्यात येत आहे. गावपातळीपासून ते महापालिका स्तरावर विविध शासकीय विभागांमार्फत या नोंदींचा शोध घेतला जातोय. त्यानुसार आतापर्यंत ८३ लाखांहून अधिक नोंदींची पडताळणी करण्यात आली आहे. त्यामध्ये महसूल स्तरावर खासरा पत्रक, पाहणी पत्रक, क-पत्रक, कूळ नोंदवही, नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टरे सन १९५१, नुमान नंबर १ व २ हक्क नोंद पत्रक तसेच सातबारा उतारा यासह जन्म-मृत्यू नोंदणी रजिस्टार, ताडी व मळी नोंदवही, खरेदीखत, बटाई खत, सेवापुस्तिका/सेवा अभिलेखे, सैन्य भरतीवेळी घेतलेल्या नोंदींसह विविध अभिलेखांच्या सहाय्याने ही पडताळणी केली जात आहे.
शासनाच्या विभागांच्या विविध पातळींवरील पडताळणीमध्ये सन १९४८ पूर्वीच्या तसेच सन १९४८ ते १९६७ या कालावधी अशा दोन टप्प्यांमध्ये नोंदींचा शोध घेण्यात येत आहे. त्यानुसार १९४८ पूर्वीच्या ३७ लाख ६३ हजार ८५ नोंदींची तपासणी पूर्ण झाली आहे. त्यापैकी १ लाख १२ हजार ४८९ नोंदींमध्ये कुणबीचा उल्लेख आढळून आला आहे. सन १९४८ ते १९६७ या काळातील ४६ लाख १ हजार ७७१ नोंदींमधून ३१ हजार ४६७ नोंदी या कुणबी नोंदी आढळल्या आहेत. अशाप्रकारे एकूण १ लाख ४३ हजार ९५६ नोंदी सापडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
हेही वाचा :