पुढारी ऑनलाइन डेस्क; उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी भोपाळ येथून ताब्यात घेतल्यानंतर त्यांना आज मालेगाव कोर्टात हजर करण्यात आले आहे. अद्वय हिरे यांच्या अडचणी वाढल्या असून आज मालेगाव कोर्ट काय निर्णय देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
अद्वय हिरे हे दादा भुसे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. शिवसेनेच्या फुटीनंतर त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर मालेगावात जणू राजकीय फटाक्यांची आतषबाजीच सुरु झाली. हिरे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी मालेगाव तालुक्यातील रमझानपुरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. बनावट दस्तऐवज तयार करून बँकेची 7 कोटी 46 लाख रुपयांची कर्ज उचलून फसवणूक केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणी त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र अद्वय हिरे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने जामीन नाकारताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आज मालेगाव कोर्टात त्यांना हजर करण्यात आले असून दरम्यान त्यांच्या समर्थकांनी कोर्टाबाहेर जोरदार घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले.