सिडकोत दोन ठिकाणी ३९७ किलो बनावट पनीर जप्त | पुढारी

सिडकोत दोन ठिकाणी ३९७ किलो बनावट पनीर जप्त

सिडको : पुढारी वृत्तसेवा : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने सातत्याने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कारवाई केली जात आहे. सिडको परिसरामध्ये धडक मोहीम राबवत दोन डेअरीमधील ८४ हजार ११० रुपये किमतीचे ३९७ किलो बनावट पनीर जप्त करण्यात आले. याप्रकरणी एफडीएने दोन पेढ्यांवर छापा टाकला आहे. सणासुदीतील दिवसांच्या पार्श्वभूमीवर लागोपाठ होत असलेल्या कारवाईमुळे भेसळ करणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

संबंधित बातम्या 

सणासुदीच्या दिवसात दर्जेदार पदार्थ उपलब्ध व्हावेत याचाच भाग म्हणून अन्न औषध प्रशासनाचे पथकाला आज सकाळी साडेसहा वाजेपासून तपासणी करण्यास सुरूवात केली होती. दरम्यान या पथकाला खादयतेलाच्या भेसळी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने दुर्गा मंदिराच्या मार्गे त्रिमूर्ती चौक सिडको विराज इंटरप्राईजेस या पिढीची तपासणी केली. या तपासणीत खाद्यतेलाच्या भेसळीच्या संशयावरून पनीरचे अन्न नमुना घेऊन सुमारे ७४ किलो किंमत १६ हजार २८० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला.

तसेच सिडकोतील उपेंद्रनगर येथील मे साई एंटरप्रायजेस, या पेढीची तपासणी करून तेथून पनीरमध्ये खादयतेलाच्या भेसळीच्या संशयावरून सुमारे ३२३ किलोचा ६७ हजार ८३० रुपये किंमतीचे पनीर साठा जप्त करण्यात आला. अशा एकूण ८४ हजार ११० रुपये किलो किमतीचा ३९७ किलो पनीर जप्त करण्यात आले.

सदरचे दोन्ही पनीर हे अन्न नमुने विश्लेषणासाठी अन्न विश्लेषक यांचेकडे पाठविण्यात आले आहे. विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा मानके कायदयाअंतर्गत पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. सदरची कार्यवाही सहाय्यक आयुक्त मनिष सानप, अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. पाटील, अविनाश दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Back to top button