Nashik News : इटलीहून यांत्रिकी झाडू नाशिकमध्ये दाखल, दिवाळीनंतर सुरू होणार रस्ते स्वच्छता | पुढारी

Nashik News : इटलीहून यांत्रिकी झाडू नाशिकमध्ये दाखल, दिवाळीनंतर सुरू होणार रस्ते स्वच्छता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; रस्ते स्वच्छतेसाठी महापालिकेने इटलीहून खरेदी केलेल्या ३३ कोटींचे चार यांत्रिकी झाडू अखेर नाशकात दाखल झाले आहेत. दिवाळीनंतर प्रादेशिक परिवहन विभागाकडील नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून या यांत्रिकी झाडूमार्फत शहरातील रस्ते स्वच्छतेच्या कामाला सुरूवात केली जाणार आहे. (Nashik News)

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून महापालिकेला प्राप्त झालेल्या अनुदानातून नॅशनल क्लिन एअर प्रोग्राम अंतर्गत प्राप्त निधीतून महापालिकेने रस्ते स्वच्छतेसाठी यांत्रिकी झाडू खरेदी केला. मंजुरीच्या तब्बल दोन वर्षांनंतर इटलीहून यांत्रिकी झाडू दाखल झाला. यांत्रिक झाडू खरेदीचा निर्णय २० सप्टेंबर २०२१ रोजीच्या महासभेत घेण्यात आला होता. पाच वर्षासाठी देखभाल-दुरुस्तीसह ३३ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव महासभेवर मंजुर करण्यात आला. त्यानंतर निविदा प्रक्रिया वर्षभर चालली. एप्रिल २०२३ मध्ये यंत्र पुरवठ्यासाठी कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. ऑक्टोंबर महिन्यात यांत्रिकी झाडू पुरविण्याची मुदत संपुष्टात आली; परंतू परदेशातून मुंबई डॉकयार्ड येथे यांत्रिकी झाडू आल्यानंतर तांत्रिक बाबी पुर्ण करण्यात वेळ गेला. दोन दिवसापुर्वी महापालिकेच्या ताब्यात यांत्रिक झाडूचे वाहन मिळाले. मात्र दिवाळीचा मुहूर्त हुकला.

कचरा वहन ऑपरेटरमार्फत

एका यांत्रिकी झाडूमार्फत ४० किलोमीटरप्रमाणे प्रतिदीन १६० किलोमीटर रस्त्याची सफाई केली जाणार आहे. गोळा केलेला कचरा वहन ऑपरेटर मार्फत केले जाणार आहे. एका यांत्रिकी झाडूसाठी दोन कोटी सहा लाख रुपये असे एकुण बारा कोटी ३६ लाख रुपये खर्च होणार आहे. पुढील पाच वर्षाच्या कालावधीत ऑपरेशन, देखभाल दुरुस्ती, इंधन, मनुष्यबळ पुरविण्यासाठी दरमहा पाच लाख ८५ हजार ७०० रुपये खर्च होणार आहे. पाच वर्षासाठी २१ कोटी आठ लाख रुपये खर्च होईल.

यांत्रिकी झाडूमार्फत या रस्त्यांची सफाई

* अशोक स्तंभ ते गंगापूर गाव.

* मुंबई नाका ते अशोक स्तंभ.

* सिबिएस ते कॅनडा कॉर्नर.

* कॅनडा कॉर्नर ते भोसला गेट.

* त्र्यंबक नाका सिग्नल ते सातपूर गाव.

* गडकरी चौक ते तिडके कॉलनी.

* चांडक सर्कल ते मुंबई नाका.

* महात्मा गांधी रस्ता, मेनरोड, नेहरु गार्डन, शालीमार.

* पंचवटी कारंजा ते रविवार कारंजा.

सहा विभागांसाठी चार यांत्रिकी झाडू खरेदी करण्यात आले असून इटलीहून खरेदी केलेली ही यंत्रे नाशिक महापालिकेच्या ताब्यात मिळाले आहे.

– बाजीराव माळी, कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभाग.

हेही वाचा :

Back to top button