Drug case : सोलापुरातील वैजनाथला एमडी फॉर्म्युला देणाऱ्याचा कसून शोध | पुढारी

Drug case : सोलापुरातील वैजनाथला एमडी फॉर्म्युला देणाऱ्याचा कसून शोध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; सोलापूर एमआयडीसीतील कारखान्यातील संशयित कारागिरास एमडी (मॅफेड्रॉन) तयार करणाऱ्या ‘फॉर्म्युला’ शिकविणाऱ्या मुख्य सूत्रधाराचाही पोलिसांनी शोध सुरू केला आहे. एमडीच्या कारखान्यात काम करण्यापूर्वी तेथील एका रसायन कंपनीत काम करून मिळालेला अनुभव संशयिताने एमडी बनवण्यास वापरल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

सामनगाव येथे पकडलेल्या एमडीचा तपास करताना अमली पदार्थ विरोधी पथक व गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सोलापूर एमआयडीसीमध्ये कारवाई करीत एमडी बनवण्याचा कारखाना व गोदाम उघडकीस आणले. या गुन्ह्यात पोलिसांनी नऊ संशयितांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिस कोठडीत असलेला वैजनाथ सुरेश हावळे (२७) याने यापूर्वी एका रसायन कंपनीत काम केल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली. तेथे मिळालेला अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर त्याने एमडीच्या कारखान्यात ड्रग्ज तयार करण्यास सुरुवात केल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे संशयित वैजनाथला एमडीचा फॉर्म्युला शिकविणाऱ्यासह मुख्य सूत्रधाराचा शोध नाशिक पोलिस घेत आहेत.

शिंदे गावातील कारखान्यावरही लक्ष
ललित पानपाटील याचा भाऊ भूषण व मित्र अभिषेक बलकवडे यांनी शिंदे गावात कारखाना सुरू करून एमडी तयार केले व वितरित केले. दरम्यान, हे दोघेही मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक पोलिस या संशयितांचा ताबा घेतील. त्यानंतर शिंदे गावातील कारखान्याचा तपासही समोर येणार असल्याची चर्चा आहे.

Back to top button