Maratha Reservation : आरक्षणासाठी धुळ्यात श्री एकविरा मातेची महाआरती | पुढारी

Maratha Reservation : आरक्षणासाठी धुळ्यात श्री एकविरा मातेची महाआरती

धुळे : पुढारी वृत्तसेवा; मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे, त्याचप्रमाणे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती उत्तम राहावी, यासाठी आज धुळ्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आदिशक्ती श्री एकविरा मातेची महाआरती करून विशेष प्रार्थना करण्यात आली. राज्यात जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांततेत सुरू असलेल्या आंदोलनामध्ये काही टोळ्यांचा समावेश झाला असून त्यांच्या माध्यमातून विध्वंसक प्रक्रिया सुरू आहे. मात्र शांततेच्या आंदोलनावर विश्वास असणारा मराठा समाज या विध्वंसक टोळ्यांच्या बरोबर जाणार नाही, अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी व्यक्त केली आहे.

धुळ्यातील मराठा क्रांती मोर्चाने आज प्रथमच श्री एकविरा मातेची महाआरती करून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांच्यासह निलेश काटे, मोहन टकले, आबा कदम, नैनेश साळुंखे, रजनीश निंबाळकर, चंद्रकांत थोरात यांच्यासह असंख्य मराठा बांधवांनी आई एकविरा चरणी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, त्याचप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती उत्तम राहावी, यासाठी विशेष महाआरती केली.

यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना मनोज मोरे यांनी सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषणामुळे सरकार देखील या समाजाला आरक्षण देण्याच्या मानसिकतेत असून आरक्षणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. हे आंदोलन विधायक मार्गाने सुरू आहे. त्याला राज्यभरातील मराठा समाजाचा पाठिंबा देखील मिळत आहे. पण मराठा समाजाला आरक्षण मिळाले तर काही लोकांची दुकाने बंद पडतील अशी काहींना भीती असल्याचा आरोप मोरे यांनी केला. जरांगे पाटील यांनी देखील जाळपोळीला आणि विध्वंसक आंदोलनाला विरोध केला आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. सरकारने देखील आरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे. मात्र या आंदोलनात काही विध्वंसक टोळी समाविष्ट झाल्या असून त्या माध्यमातून जाळपोळ, गाड्या जाळणे, तसेच लोकप्रतिनिधींचे घरांची जाळपोळ करण्याचे प्रकार सुरू आहे. शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला हा विध्वंस अभिप्रेत नाही. त्यामुळे महाआरती करत असताना आज आपण देवीला राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळली जावी, त्याचप्रमाणे निरपराध  व्यक्तींवर कोणताही खोटा गुन्हा दाखल होऊ नये, तसेच चुकीच्या पद्धतीने आंदोलन भडकावणाऱ्या व्यक्तींवर कारवाई व्हावी, अशी प्रार्थना केली असल्याचे मोरे यांनी म्हटले आहे.

Back to top button