घोटी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; खातेदारांनी बंद करण्यासाठी दिलेल्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून परस्पर व्यवहार करीत एका बँकेच्या माजी कर्मचाऱ्याने संबंधितांना जवळपास २८ लाखांना चुना लावला. एचडीएफसी बँकेच्या घोटी शाखेतील माजी कर्मचाऱ्याने हा प्रताप केला असून, त्याच्याविरोधात शाखा व्यवस्थापकांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार घोटी पोलिसांचे पथक मुंबईला तपासासाठी रवाना झाल्याचे समजते.
घोटी येथील 'एचडीएफसी' शाखेचे व्यवस्थापक विशाल हरदास (रा. नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, माजी कर्मचारी स्वप्निल राजन नांदे हा फेब्रुवारी 2021 ते 27 जुलै 2023 या कालावधीत बँकेत नोकरीस होता. या काळात काही खातेदारांनी त्यांचे क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी स्वप्निलकडे दिले होते. त्याने या क्रेडिट कार्डच्या केवायसीत फेरफार केला. मोबाइल क्रमांक व ई-मेल आयडी बदलून त्यानंतर कार्डच्या माध्यमातून 28 लाख 27 हजार रुपयांचे व्यवहार केलेत. या व्यवहारांचे बिल न भरता खातेदारांची व बँकेची फसवणूक केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तत्काळ गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदेश पवार हे पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा :