

धुळे : पुढारी वृत्तसेवा ; धुळे तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या बालकांच्या वारसांना तातडीने 25 लाख रुपये द्यावेत तसेच त्या नरभक्षक बिबट्याला तत्काळ जेरबंद अथवा बेशुध्द करावे आणि शक्य न झाल्यास ठार करावे, असे आदेश राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगनटीवार यांनी मुख्य वन्य जीव रक्षक तथा प्रधान मुख्य वन संरक्षक महिपत गुप्ता यांना दिल्याची माहिती आमदार कुणाल पाटील यांनी दिली आहे. बिबट्याचा बंदोबस्त व्हावा आणि वारसांना आर्थिक मदत मिळावी म्हणून आज आ.कुणाल यांनी वनमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर सदर आदेश धुळे उपवनसंरक्षक यांना दिले. दरम्यान बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची रेस्क्यू टीम सज्ज करण्यात आली असल्याची माहिती आ.पाटील यांनी दिली आहे. (Dhule Leopard New)
गेल्या काही दिवसापासून धुळे तालुक्यातील बोरी पट्टयात बिबट्याने धुडगूस घातला आहे. या नरभक्षक बिबट्याने आतापर्यंत 2 जणांचा बळी घेतला आहे. तर एका बालकाला गंभीर जखमी केले आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी आ.कुणाल पाटील यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. त्यांना धुळे तालुक्यातील सर्व परिस्थिती लक्षात आणून दिली. यावेळी मंत्री मुनगंटीवार यांनी बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकार्यांना यावेळी दिले. यावेळी आ.कुणाल पाटील यांनी मंत्री यांच्या दालनातून नागपूर येथील राज्याचे मुख्य वन्य जीव रक्षक तथा प्रधान मुख्य वन संरक्षक महिपत गुप्ता यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी बिबट्याला बेशुध्द करण्याचे आणि तसे शक्य न झाल्यास ठार मारण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले. दरम्यान बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करुन वारसांना तातडीने 25 लक्ष रुपये मदत द्यावी अशा सूचना ना.मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या. तसेच पुणे येथील वनविभागाचे व एनजीओचे पथक या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पाचारण करण्यात आले असून लवकरच या बिबट्यांना जेरबंद करण्यात यश येईल अशी खात्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी आ.कुणाल पाटील यांना दिली. (Dhule Leopard News)
वनविभागाची रेस्क्यू टीम सज्ज करण्यात आली असून धुळे, जळगाव, नाशिक आणि पुणे येथील वनविभागाची पथके या रेस्क्यू टीममध्ये सहभागी झाले आहेत. रात्रीच्यावेळी कॅमेरा ट्रॅप लावून हालचाली टीपण्याचा उपाय योग्य ठरतो. बिबट्याचे आवडते खाद्य श्वान देखील पिंजर्यात सावज म्हणून ठेवण्याचा प्रयोग केला जाणार आहे. बोरी पट्टयात अनेक ठिकाणी पिंजरे व कॅमेरे ट्रॅप लावण्यात आले आहेत. अशी माहिती धुळे उपवनसंरक्षक अनिलकुमारसिंग यांनी आ.कुणाल पाटील आणि मंत्री ना.मुनगंटीवार यांना दिली.
निरपराध बालकांचा बळी घेणार्या नरभक्षक बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा आणि बळी गेलेल्या मुलांच्या वारसांना त्वरीत आर्थिक मदत द्यावी अशी मागणी धुळे तालुका काँग्रेसतर्फे धुळे उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धुळे तालुक्यात बोरकुंड, होरपाडा, मोघण, देऊर खु., देऊर बु.,लोहगड, लोणखेडी, मांडळ, रतनपुरा इत्यादी वनक्षेत्रात लगत असणार्या गावात आणि शिवारात गुराढोरांच बळी घेणार्या बिबट्याने दोन मुलांचा बळी घेतला. तर एक जण गंभीर जखमी आहे. धुळे वनविभागाने आधीच उपाययोजना केली असती तर हा अनर्थ टळला असता. अनेकवेळा तक्रारी करुनही वनविभागाने दुर्लक्ष केले. त्यामुळे वनविभागात बंदोबस्त वाढविणे, पिंजरे लावणे, सुरक्षा कर्मचार्यांचा कॅम्प लावणे, तसेच वन्य प्राण्यांसाठी तातडीने पाणवठे निर्माण करणे अशा उपाय योजना कराव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, संचालक साहेबराव खैरनार, माजी सभापती गुलाबराव कोतेकर, खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील, बाजार समितीचे उपसभापती योगेश पाटील, माजी पं.स.सदस्य पंढरीनाथ पाटील, विशेष कार्यअधिकारी प्रकाश पाटील आदी उपस्थित होते
हेही वाचा :