नाशिक : पुढारी वृत्तसेवा; ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणाचा संबंध पालकमंत्री दादा भुसे यांच्याशी जोडला जात आहे. पण, २०१६ मध्ये पाटीलला शिवसेनेत प्रवेश देणारे तत्कालीन संपर्कप्रमुख खा. संजय राऊत कुठे आहेत? पक्षप्रवेशापूर्वी उद्धव ठाकरे यांनीदेखील संबंधिताची शहानिशा करून घेणे गरजेचे होते, अशा शब्दांत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उबाठा नेत्यांवर शरसंधान केले. उबाठाने ललित पाटीलची पक्षातून हक्कालपट्टी केली का हे स्पष्ट करावे, असे आव्हान देताना सध्या त्या पक्षात दिव्याखाली अंधार अशी परिस्थिती असल्याचा आरोपही गोऱ्हेंनी केला.
ड्रग्ज प्रकरणावरून नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांना घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना गुरुवारी (दि.१९) नाशिकमध्ये आलेल्या डॉ. गोऱ्हे यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांचा समाचार घेतला. ड्रग्ज प्रकरणावरून विरोधकांकडून सुरू असलेले राजकारण चुकीचे असल्याचे त्या म्हणाल्या. खा. राऊत यांच्यावर निशाणा साधताना २०१६ ला ललित पाटील याला शिवसेनेत घेताना त्याची पार्श्वभूमी तपासली का नाही, असा थेट सवालच गोऱ्हे यांनी केला.
ड्रग्ज प्रकरणात कोणाकडे काही पुरावे, असल्यास त्यांनी पोलिस किंवा मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांकडे सादर करावे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांवर विश्वास नसल्यास ते पुरावे थेट उच्च न्यायालयात सादर करावे, असे आवाहन गोऱ्हेंनी विरोधकांना केले. या प्रकरणी पोलिसांसमवेत एफडीएदेखील तेवढेच जबाबदार असल्याचे सांगत एसआयटी, सीआयडीमार्फत तपास करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले.
राजीनामा पाहायची सवय
ड्रग्ज प्रकरणात पालकमंत्री भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांच्या पक्षात राजीनामा पाहायची सवय लागली आहे. बरे झाले त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही, असा टोला लगावताना भुसे विरोधकांना पुरून ऊरतील, असा दावा गोऱ्हेंनी केला.पाटीलने आडनाव बदलले
ललित पाटील याला शिवसेनेत प्रवेश देताना खा. राऊत स्थानिक पदाधिकाऱ्यांचे किती एेकत होते, हे सर्वांना ठाऊक असल्याचा आरोप गोऱ्हे यांनी केला. त्यामुळे राऊत यांनी या प्रकरणी जबाबदारी घेतली पाहिजे, असे सांगताना पाटीलने दोन वेळा आडनाव बदलल्याचा दावा केला. पाटीलला कोणी आश्रय दिला यासोबत सोशल मीडियावर पाटीलसोबतच्या छायाचित्रांमध्ये ज्या-ज्या व्यक्ती दिसत आहेत, त्यांची चाैकशी करावी, अशी मागणी गोऱ्हेंनी केली.