Navratri 2023 : नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिकामाता | पुढारी

Navratri 2023 : नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिकामाता

नाशिक : शहरातील जुन्या आग्रा रोडवरील अतिप्राचीन श्री कालिकामातेचे मंदिर म्हणजे नाशिकचे वैभव. नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या श्री कालिकामातेचे हे स्थान जागृत आहे. श्री कालिकामाता हाकेला धावून येत असल्याने भक्तांची देवीवर दृढ श्रद्धा आहे. (Navratri 2023)

कलाकुसरीने नटलेले मंदिर व सभामंडप दिमाखात उभे आहे. मंदिरामधील मातेचे रूप अतिशय लोभस आणि सात्त्विक आहे. गाभाऱ्यात महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांच्या मूर्ती आहेत. मंदिरातील श्री कालिकामाता कुमारिकेच्या स्वरूपात आहे. तिचे स्वरूप चंडिकेसारखे उग्र नसून एखाद्या लहान बाल‌िकेसारखे अतिशय लोभस आणि सात्त्विक आहे. देवीच्या मागे नऊ फण्यांचा शेषनाग आहे. तिच्या पायाखाली तीन राक्षसांचे शीर असून, त्यावर कालिकादेवी उभी आहे. तिच्या उजव्या हातांत त्रिशूल व तलवार तर डाव्या हातात डमरू व खडग आहे. कमंडलूसारखे भांडेदेखील आहे. नवरात्रोत्सवामध्ये लाखो भाविक कालिकामातेच्या चरणी लीन होतात.

जयपूरहून देवींच्या तिन्ही मूर्ती घडविल्या…

सध्या या मंदिरात कालिका माता, महालक्ष्मी व महासरस्वती यांच्या मूर्ती आहेत. सुरुवातीला फक्त कालिका मातेचे मंदिर येथे होते. कालांतराने देवीभक्तांनी महालक्ष्मी व महासरस्वती च्या मूर्ती भेट दिल्या. त्यानंतर देवींच्या या तीनही मूर्ती थेट जयपूरहुन तयार करुन, त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.

दरवर्षी भरते मोठी यात्रा….

स्वातंत्र्यपूर्वकालिन म्हणजे लोकमान्य टिळकांच्या स्वराज्याच्या चळवळीपासून श्री कालिका देवीची यात्रा भरते. नवरात्रोत्सव काळात नाशिककर मोठ्या सख्येंने यात्रेत सहभागी होतात. याकाळात कालिका मातेच्या दर्शनासाठी रांगा लागतात. दिवसेंदिवस यात्रेचे जास्त स्वरुप होऊ लागले आहे.

Back to top button