Saptashrungi Devi Vani : साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ वणीची सप्तशृंगी देवी | पुढारी

Saptashrungi Devi Vani : साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ वणीची सप्तशृंगी देवी

तुषार बर्डे, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी देवीचे मंदिर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. अर्ध्या पीठाचे महत्त्वाचे स्थान देवीला आहे. देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यांतूनही भाविक येतात. दरवर्षी नवरात्रोत्सवात गडावर मोठी यात्रा भरते. जाणून घेऊया सप्तशृंगी माता व गडाविषयी… (Saptashrungi Devi Vani)

भगवतीचे स्वरूप व स्थळाचे धार्मिक महत्व…

श्री सप्तशृंगी (भगवती) हे आद्य स्वयंभू शक्तीपीठ आहे. एकूण १८ हातात विविध अस्त्र धारण केलेली भगवती ही महालक्ष्मी, महासरस्वती व महाकालीचे त्रिगुणात्मक स्वरूप असून देवीचा आकार ११ फुट उंच व ९ फुट रुंद असून पूर्वमुखी व डाव्या बाजूला जराशी झुकलेली मान स्वरूपातील अतिसुंदर व विशाल मूर्ती आहे. सप्तचिरंजीवी ऋषी महर्षी मार्केंड ऋषींनी लिहिलेल्या दुर्गासप्तशतीचे श्रवण करत असतांना भगवती या शिखरावर ध्यानरूपी विराजमान झाली. सह्याद्रीच्या सात विविध शिखरांच्या (श्रुंग) परिसरात विराजमान झालेली देवी म्हणून भगवतीच्या या स्वरूपाला सप्तशृंग निवासिनी देवी असे संबोधले गेले आहे. (Saptashrungi Devi Vani)

प्रभू रामचंद्र दंडकारण्यातील प्रवासा दरम्यान भगवतीचा कृपाशीर्वाद घेवून पुढील प्रवासात मार्गक्रमन केल्याचे संदर्भ रामायणात आहेत. संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर यांची माता सप्तशृंगी ही कुलस्वामिनी आहे. (संदर्भ: ज्ञानेश्वरी ग्रंथातील १८ वा अध्याय) नवनाथ संप्रदायातील सर्व नाथांची ही ध्यान भूमी असल्याचे अध्यात्मिक पुरावे नवनाथ कथासारात आहेत. शिवचरित्रात छत्रपती शिवाजींचा सुरतेच्या लुटीच्या दरम्यान येथील दर्शनाचा संदर्भ काही इतिहासकारांनी नोंदविलेला आहे. पेशवे आणि अहिल्याबाई होळकर यांनी येथील जलकुंड आणि मंदिराचा जिर्णोधार केल्याचे काही संदर्भ सांगितले. शिर्डीच्या साईबाबांची भगवतीच्या श्री सप्तशृंग स्वरूपावर नितांत श्रद्धा होती. बाबा बऱ्याचदा भगवती दर्शनासाठी येथे आल्याचे तसेच तात्या कोते (बाईजा कोते यांचा मुलगा) या मानलेल्या भावासाठी बाबांनी भगवतीला नवस देखील केल्याचे संदर्भ उपलब्ध आहेत.

अशी आहे देवीची कथा…

(Saptashrungi Devi Vani)

राजा दक्षाने केलेल्या यज्ञात शिवशंकर भगवानांचा अर्थात पतीचा झालेला अवमान सहन न झाल्याने सतीने यज्ञात आहुती देत स्वत:चा जीवन प्रवास संपविला असा प्रकार शिवाला कळताच ते त्या ठिकाणी गेले. त्यांनी सतीचे पार्थिव उचलले आणि रागिष्ट होऊन आपले तिसरे नेत्र उघडून तांडवनृत्य करायला सुरुवात केली. त्याचा परिणाम संपूर्ण सृष्टीत हाहाकार माजला. सगळीकडे निसर्गाने कोप घेतला. हा घडत असलेला प्रकार जर कोणी रोखला नाही तर संपूर्ण सृष्टी उद्ध्वस्त होईल. म्हणून विष्णूंनी आपल्या हातातील सुदर्शनचक्र सतीच्या पार्थिवाकडे फेकले. सुदर्शनचक्राने सतीचे एक्कावन्न तुकडे झाले आणि संपूर्ण पृथ्वीवर पसरले, तेव्हा शिवाचा राग शांत झाला. त्याच क्षणी शिव भानावर आले आणि त्यांनी सतीचे असे तुकडे पाहून विष्णूंना श्राप दिला. या शापाला मोडण्यासाठी विष्णूंनी एकावन्न सतीच्या शक्तिपीठांकडे जाऊन भगवती देवीची आराधना केली तेव्हा भगवती देवींनी विष्णूंना आशीर्वाद देऊन मी पार्वतीच्या रूपात येईन असे सांगितले. तेव्हा विष्णूंनी शिव-शंकरांना वचन दिले की सती ही पर्वताची म्हणजेच हिमालयाची पुत्री बनून येईल आणि पार्वतीच्या रूपात पुन्हा जन्म घेईल. या घटनेत सतीचे शक्तिपीठ भारतवर्षात एकावन्न जागांवर पडले म्हणून यांना एकावन्न शक्तिपीठ म्हणतात. सतीला उत्तर भारतात सतीला सती असे म्हणतात आणि दक्षिण भारतात सतीला दक्षायानी नावाने ओळखतात. तसेच या व्यतिरिक्त देवीचे तीन महत्वाचे स्वरूप मानले जातात. त्यात प्रामुख्याने महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती यांचा समावेश होतो. असे एक त्रिगुणात्मक स्वरूप अर्थात श्री सप्तशृंगी माता उर्फ वणीची देवी किवा नांदुरी गडाची देवी अशी या तीर्थक्षेत्राची ओळख आहे.

देवीच्या सर्व स्वरुपांचे नवरात्रीत पूजन ….

आध्यत्मिक सेवेत शाक्त, शैव, वैष्णव, महानुभव, नाथ आदी विविध पंथ व संप्रदायातील अनुभव, अनुभूती व श्रद्धेवर देवदेवतांची साधना अवलंबून आहे. त्यातील शाक्त हा एक महत्वाचा पंथ असून ज्यात देवीची अर्थात शक्तीची सात्विक पध्दतीने वैदिक मंत्रोच्यारात पुजा केली जाते. या पंथाची स्थापना नाथजोगी नावाच्या सांप्रदायिकांनी केली. नाथानी या संबंधी शिवपार्वती संवादरूप अनेक ग्रंथ लिहिले. त्यास तंत्र असे म्हणतात. त्यात पूजा, न्यास, मुद्रा, बीजाचे मंत्र वगैरे अनेक विधी समाविष्ट आहेत. यातील देवतांस दशमहाविद्या असे म्हणतात. दशमहाविद्या प्रकारात प्रामुख्याने श्यामा, तारा, त्रिपुरा, बगलामुखी, छिन्नमस्तका, मातंगी, धुमावती, भैरवी, महाविद्या व भुवनेश्वरी असे देवीचे विविध स्वरूप असून याव्यतिरिक्त ९ दुर्गा प्रकारात देखील देवीची पूजा केली जाते, त्यात शैलपुत्री, ब्रम्हचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौर व सिद्धिदात्री असे स्वरूप समाविष्ट आहेत. या सर्व स्वरूपांचे नवरात्रीत विशेष पूजन केले जाते.

गडावर जाण्यासाठी व राहण्यासाठी व्यवस्था…

देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्त्वाचे स्थान नाशिकच्या सप्तश्रृंगीगडाला आहे. सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी दहा किलोमीटरचा घाट पार करून जावे लागते. नाशिकपासून 65 किलोमीटर अंतरावर सप्तशृंगी तीर्थक्षेत्र आहे. शिर्डी पासून 125 किलोमीटर अंतरावर सप्तशृंगीगड आहे. औरंगाबाद या ठिकाणावरून साडेतीनशे किलोमीटर अंतरावर सप्तशृंगीचे ठिकाण असून मुंबई सप्तशृंगीडापासून ३५० किलोमीटरवर आहे. सप्तशृंगी गडावरून त्र्यंबकेश्वर, गुजरात मधील सापुतारा व शिर्डी आदी ठिकाणे जवळ असून या ठिकाणी भावीक भक्तांना राहण्यासाठी देवी संस्थांचे भक्त निवास असून वीस रुपयांमध्ये महाप्रसादाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सप्तशृंगीगड निसर्गरम्य पर्यटनस्थळ असल्याने या ठिकाणी गुजरात, मध्य प्रदेश व इतर भारतातील भाविक भक्त येत असतात. या ठिकाणी वर्षातून नवरात्रोत्सव व चैत्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो. तसेच सप्तशृंगी देवीच्या शिखरावरती ध्वज लावण्याची 500 वर्षाची परंपरा कायम आहे.

गडावर होणारे महत्वाचे उत्सव

चैत्र नवरात्र (रामनवमी ते हनुमान जयंती), अश्विन / शारदीय नवरात्र (घटस्थापना ते दसरा), शाकंबरी पौर्णिमा (माहे जानेवारी), कोजागिरी पौर्णिमा, दर महिन्याची दुर्गाष्टमी (नवचंडी व नगर प्रदक्षिणा उपक्रम) व पौर्णिमा उत्सव महत्वपूर्ण मानले जातात. मोठ्या संख्येने या काळात भाविक गडावर दर्शनासाठी येतात. यासह वर्षभरात धनुरमास (डिसेंबर-जानेवारी), कृष्णजन्माअष्टमी, गणेश जयंती, हनुमान जयंती, रामनवमी, कालभैरव जयंती इत्यादी उत्सव वर्षभरात न्यासाच्या वतीने साजरे केले जातात.

नवरात्र काळात मा. विश्वस्त मंडळ प्रतिनिधीना मानाची पूजा (महापूजा) करण्याचा व पौराणिक परंपरेनुसार दरेगाव येथील गवळी समाजातील कुटुंबाला चैत्र व अश्विन नवरात्र पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला श्री. भगवतीच्या शिखरावर ध्वजारोहण करण्याचा मान दिला जातो.

व्यवस्था आणि सेवा सुविधा

वर्षभरात या आद्यशक्ती पिठाला दर्शनासाठी अंदाजे ४० लाख व त्यापेक्षा अधिक भाविक महाराष्ट्र व गुजरात राज्यासह इतर राज्यातून मोठ्या संख्येने येतात. त्यासाठी विश्वस्त संस्थेच्या वतीने विविध सेवा सुविधा उभारण्यात आल्या आहेत. त्या प्रामुख्याने पुढील प्रमाणे-

धार्मिक पूजा विधी सुविधा :

विविध ठिकाणावरून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या धार्मिक पूजा विधी साठी विश्वस्थ संस्थेने पहिली पायरी येथे भव्य चिंतन सभागृह उभारला असून तेथे भाविकांना चिंतन, पूजा व पाठ वाचण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच नाममात्र दरात श्री भगवतीच्या विविध पूजा, आरत्या तसेच यज्ञ सेवा कार्यान्वित केल्या आहेत.

श्री. भगवतीच्या दैनंदिन पूजा, आरती, पंचामृत महापूजा आणि मासिक नवचंडी यज्ञ आदींचा तपशील

१. काकड आरती – स.५.३० – ६.००वा.
२. पंचामृत महापूजा – स.७.००-९.३०वा.
३. महानैवद्य आरती – दु.१२.००-१२.३०वा.
४. सांज आरती – सायं.७.००-८.००वा.
५. नवचंडी याग (यज्ञ) महिन्याच्या दुर्गाष्टमी व कालाष्टमीच्या मुहूर्तावर स.९.३०-३.३०वा.

पुरोहित वर्ग : परंपरेनुसार दिक्षित व देशमुख परिवार (घराण्याला) भगवती पूजेचा मान देण्यात आलेला आहे.

भक्तनिवास व्यवस्था…
विविध ७ भक्तनिवास (इमारती) व्यवस्थेअंतर्गत एकूण २२५ खोल्या, १+३+२ = ६ सभागृह असे मिळून २३१ खोल्या अंतर्गत अधिकतम १२५० व्यक्तींची राहण्याची व्यवस्था आणि एकूण ६ सभागृहाच्या माध्यमातून एकूण १५०० लोकांची निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

अन्नपूर्णा प्रसादालय…
एकाच वेळेस एकूण २,००० भाविक प्रसाद घेवू शकतील इतकी मोठ्याप्रमाणावर बैठक व्यवस्था आणि आधुनिक यंत्र सामग्रीसह महाप्रसादाची व्यवस्था न्यासांतर्गत उभारण्यात आलेली आहे. या सुविधेअंतर्गत प्रत्येक महिन्याची पौर्णिमा, दुर्गाअष्टमी व चैत्र व अश्विन नवरात्रीत भाविकांना देणगीदार भाविक व न्यासाच्या खर्चातून मोफत अन्नदान सुविधा दिली जाते.

धर्मार्थ दवाखाना…
देवस्थान अंतर्गत भाविक आणि स्थानिक ग्रामस्थांसाठी प्राथमिक स्तरावर मोफत निदान, उपचार सुविधा दिली जाते. तसेच अत्यावश्यक उपचारासाठी २ वाहनाच्या माध्यमातून मोफत रुग्णवाहिका सुविधा पुरवली जाते.

स्वच्छता आणि सुरक्षा…
भाविकांसाठी २४ तास सुरक्षा व्यवस्था उपलब्ध असून, देवस्थान आणि गावातील संपूर्णता स्वच्छता देवस्थानच्या स्वच्छता विभागा अंतर्गत केली जाते.

ए.टी.एम सुविधा…
विविध ठिकाणावरून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या आर्थिक सुविधा व्हावी म्हणून न्यासाने नुकतीच महाराष्ट्र बँक व भारतीय स्टेट बँक अंतर्गत विविध ए.टी.एम. सुविधा सुरु केली आहे. त्यामुळे भाविकांना विशेष सुविधा देणे शक्य झाले.

आणखी काही महत्वाचे…

मंदिर परिसरात विविध मंदिरे आहेत. त्यात प्रामुख्याने म्हैशासुर मंदिर, राम मंदिर, राध्ये-शाम मंदिर, दत्त मंदिर, कालभैरव मंदिर, नागाई माता मंदिर, मुंब्बादेवी मंदिर, शनी व मारुती मंदिर आदींचा समावेश होतो. त्या व्यतिरिक्त ६० पायरी गणेश, मार्केंड डोंगर, भुवनेश्वर शंकर – मार्केंडपिंपरी, निराकार रूप: वणी येथिल भगवती माता, परशुराम बाळा, १०८ जलकुंड (कालिका, तांबट, देव नळी, ईटाळशी, पंजाबी, खर्जुल्या, लक्ष्मी, चांभार, सूर्य, चंद्र आदी कुंड असून इतरांचा शोध सुरु आहे. शिवालय तलाव, हनुमान मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, कालेश्वर मंदिर, नवनाथ गुफा, दरेगाव बारीतील डोंगर व विविध सौंदर्याने नटलेला निसर्ग हा बघण्यासारखा आहे.

हेही वाचा :

Back to top button