धुळे : आयुष्मान भव मोहीमेचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देणार

धुळे : आयुष्मान भव मोहीमेचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देणार

धुळे : पुढारी वृत्तसेवा, आयुष्मान भव मोहिमेतंर्गत दिलेल्या सहा निर्देशांकाचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पातळीवर आयुष्मान ग्रामपंचायत घोषित करुन पुरस्कार देण्यात येणार असल्याने या अभियानात जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी बोरकुंड येथे केले.धुळे तालुक्यातील बोरकुंड येथे आयुष्मान भव मोहिमेतंर्गत सावता मंगल कार्यालय येथे सोमवारी आयुष्मान ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी गुप्ता बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रा.अरविंद जाधव, होते. तर जिल्हा परिषद सदस्य शालिनी भदाणे, अनिता पाटील, पंचायत समिती उपसभापती देवेंद्र माळी, सरपंच सुनीता भदाणे, उपसरपंच बेबाबाई माळी  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता म्हणाले की, केंद्र शासनामार्फत सर्व जिल्ह्यांमध्ये 13 सप्टेंबर ते 31 डिसेंबर, 2023 या कालावधीत आयुष्मान भव मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत मार्च 2024 पर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये सर्व 5 वर्षावरील पात्र लाभार्थी यांना आयुष्मान कार्डचे वाटप करणे, 5 वर्षावरील सर्व नागरिकांना आभा कार्डचे वाटप, 30 वर्षावरील नागरिकांची मधुमेह व उच्चरक्तदाब तपासणी, संशयीत कर्करोग निदान व उपचार, 30 वर्षांपर्यत नागरिकांची सिकलसेल तपासणी, संशयीत कुष्ठरोग तपासणी व यशस्वी उपचार करुन ग्रामपंचायतस्तरावर वरील सहा निर्देशकांचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींना केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचातीनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन गुप्ता यांनी यावेळी केले.

तसेच आयुष्मान भव मोहिमेतंर्गत 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत सर्व आरोग्यावर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्यवर्धिनी उपकेंद्र, आयुष आरोग्यवर्धिनी केंद्र या ठिकाणी आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या मोहिमेंतर्गत महिन्याच्या पहिल्या शनिवारी असंसर्गजन्य आजार मधुमेह व उच्च रक्तदाबचे निदान व उपचार, दुसऱ्या शनिवारी टी.बी. व इतर संसर्गजन्य आजार तपासणी व उपचार, तिसरा शनिवार माता आरोग्य व बाल आरोग्य तपासणी, पोषण आहार मार्गदर्शन व चौथा शनिवार सिकेल सेल तपासणी व सिकेल सेल कार्ड वाटप तसेच कान, नाक व घसा तपासणी तसेच नेत्र रोग तपासणी करण्यात येणार आहे. तसेच या आयुष्यमान मोहिमेची माहिती देण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने ग्रामसभेचे आयोजन करावे. या ग्रामसभेत नागरिकांना आयुष्यमान कार्ड, आभाकार्डची माहिती द्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी माजी कृषी सभापती जाधव म्हणाले की,  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आरोग्य हीच खरी संपत्ती आहे हे जाणले म्हणूनच  तळागाळातल्या शेवटच्या माणसाला आरोग्याचे कवच मिळावे या हेतूने आयुष्यमान भव अभियान संपूर्ण देशात राबवले जात आहे.  आयुष्मान भव मोहिमेतंर्गत दिलेल्या सहा निर्देशांकाचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पातळीवर आयुष्मान ग्रामपंचायत घोषित करुन पुरस्कार देण्यात येणार आहे. यासाठी केंद्र शासनाने काही इंडिकेटर निश्चित केले आहे. त्यांचे पालन जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीने केले तर ग्रामपंचायत ही आयुष्यमान ग्रामपंचायत घोषित होईल. तसेच बोरकुंड ग्रामपंचायतीला हा पुरस्कार मिळण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी व नागरिकांनी सहकार्य केल्यास नक्कीच हा पुरस्कार प्राप्त होईल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रास्ताविकात बोलतांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बोडके म्हणाले की, आयुष्यमान कार्ड मार्फत नागरिकांना 1296 आजारावर 5 लाखापर्यंत मोफत उपचार केले जातात. बोरकुंड गावात 660 आयुष्यमान कार्डचे लाभार्थी असून त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच हे कार्ड मिळण्यासाठी  सर्व ग्रामपंचायतीमध्ये आठवड्यातून दोन दिवस कॅम्पचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच आशा सेविकांमार्फत लाभार्थीची माहिती घेण्यासाठी घरोघरी सर्व्हेक्षण करीत आहे. तसेच 5 वर्षावरील सर्व नागरिकांनी आभाकार्ड काढण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ.तरन्नुम पटेल यांनी यावेळी अवयव दानाची शपथ उपस्थितांना यावेळी दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते टीबी चॅम्पियन, निश्चय मित्र यांचा सन्मान करण्यात आला व आभा कार्डचे वितरण करण्यात आले. या ग्रामसभेच्या निमित्ताने आयोजित शिबिरास मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी भेट दिली व ग्रामस्थांची विचारपूस देखील केली. यावेळी रावसाहेब भदाणे, भीमराव देवरे, रवींद्र भदाणे, संजय माळी, मोहन भदाणे, मनोज अहिरे, दिनेश पाटील, संजय भदाणे, प्रशांत आढावे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चंद्रशेखर भदाणे यांनी तर आभार प्रदर्शन मनोज अहिरे यांनी केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news