पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील आमळी येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील बारावीत शिकणाऱ्या रंजना चौरे या विद्यार्थिनीने दहिवेलनजीक मुंगबारी परिसरात जीवन संपवले. या वेळी तिच्यासह एका तरुणाने देखील याच ठिकाणी जीवन संपवले. या घटनने
मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी संतप्त नातेवाइकांसह विविध आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत मृतदेह न स्वीकारण्याची भूमिका घेतली होती. या अनुषंगाने विविध आदिवासी संघटनांकडून प्रकल्पाधिकारी प्रमोद पाटील यांना निवेदन देत कारवाईची मागणी करण्यात आली होती. अखेर आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्पाधिकाऱ्यांमार्फत गृहपाल जाधव यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारला.
दोषींवर कारवाईची मागणी
दरम्यान रविवारीच साक्री तालुक्यातील आमळी येथील अनुदाणीत आश्रमशाळेतील पाचवीच्या विद्यार्थ्यांने देखील आपले जीवन संपवले. त्या प्रकरणाची देखील सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आदिवासी संघटनांतर्फे करण्यात आली आहे. याप्रकरणी आदिवासी एकता परिषद, एकलव्य संघटना, महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान, रावण राज गृप, संकल्प आदिवासी युवा जागृती संघटना, आदिवासी महासंघ आदी संघटना प्रतिनिधींनी प्रकल्पाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील बारावीत शिक्षण घेणा-या विद्यार्थीनीच्या मृत्यूप्रकरणी वसतिगृहाच्या गृहपाल विमल शिवाजी जाधव यांना निलंबित करण्यात आले. निलंबनाचे आदेश एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांनी काढले