

नाशिक : कारमधील रोकड व कारची चावी घेऊन नोकर फरार झाल्याची घटना पेठरोडवर घडली. या प्रकरणी दीपक देवीदास लड्डा (५५, रा. त्र्यंबकेश्वर) यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात संशयित संगम संजय मुळे (३०, रा. त्र्यंबकेश्वर, मूळ रा. जि. लातूर) याच्याविरोधात चोरीची फिर्याद दाखल केली आहे.
दीपक यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दि. ३०) सायंकाळी ते कारसह पेठ फाटा परिसरात आले होते. त्यावेळी त्यांच्याकडे नोकरीस असलेल्या संगम मुळे याने संधी साधून कारमधील २ लाख १ हजार रुपयांची रोकड व वाहनाची चावी चोरून नेली. या प्रकरणी पंचवटी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
जमावाकडून एकाला मारहाण
नाशिक : आर्थिक कारणावरून कुरापत काढून जमावाने संजय बाबूलाल महाजन (५३, रा. श्रमिकनगर, सातपूर) यांना मारहाण केल्याची घटना रविवारी (दि. १) सकाळी घडली. संजय यांच्या फिर्यादीनुसार, संशयित खंडू लक्ष्मण जाधव, किशोर जाधव, रोहित महिंदळे व इतर पाच ते सहा जणांच्या टोळक्याने श्रमिकनगर येथील वृंदावन गार्डनजवळील परिसरात कुरापत काढून मारहाण केली. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पार्किंगवरून दोन कुटुंबांत हाणामारी
नाशिक : पार्किंगवरून वाद झाल्याने दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार खुटवडनगर येथे घडला. या प्रकरणी दोन्ही कुटुंबांतील सदस्यांनी अंबड पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल केली आहे. रविवारी (दि. १) सकाळी 6 च्या सुमारास हा प्रकार घडला. हेमराज व्ही. गांगुर्डे (४७, रा. चाणक्यनगर, खुटवडनगर) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित गायत्री भवर, अरुण भवर, यश भवर यांनी वाहन उभे करण्याच्या कारणावरून कुरापत काढून शिवीगाळ, मारहाण केली. तसेच पत्नीला धक्का देऊन खड्ड्यात पाडल्याने गंभीर दुखापत झाली. तर गायत्री ए. भवर यांच्या फिर्यादीनुसार, संशयित हेमराज गांगुर्डे, योगिता गांगुर्डे व देवयानी गांगुर्डे यांनी पार्किंगवरून कुरापत काढून मारहाण करीत खड्ड्यात ढकलल्याने हेमराज यांना गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :