नंदुरबार : “दिव्यांगांच्या दारी” कार्यक्रमासाठी मोफत बससेवा
नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा
नंदुरबार जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. दिव्यांग कल्याण मंत्रालय आयोजित "दिव्यांगांच्या दारी" कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाद्वारे विशेष बसफेऱ्या आयोजित करण्यात आल्या आहेत. या बसफेऱ्या दिव्यांग बांधवांना त्यांच्या जिल्ह्यातील संबंधित तालुक्यांतून नंदुरबार येथे कार्यक्रमस्थळी ने-आण करतील.
दिव्यांग कल्याण मंत्री मनीषा खत्री यांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यात दि. ७ सप्टेंबर २०२३ रोजी दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान राबविणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, नंदुरबार येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंत्री खत्री यांनी केले आहे.
दिव्यांगांना कार्यक्रमस्थळी पोहोचण्यास सोयीस्कर व्हावे यासाठी त्यांच्यासाठी मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बसफेऱ्या तालुकास्तरावरून आयोजित करण्यात आल्या आहेत.
- शहादा आगारची बस धडगांव मार्ग असली जमाना- तलई चुलवड मार्गे नंदुरबार येथे येईल.
- अक्कलकुवा आगाराची बस मोलगी येथून अक्कलकुवा वाण्याविहिर निझर मार्गे नंदुरबार.
- शहादा आगाराची बस शहादा हुन सारंगखेडा-निमगुड मार्गे- मांजरे- कोपर्ली – भालेर उमदें मार्गे नंदुरबार येथे येईल.
- नंदुरबार आगाराची बस धानोरा हुन-लोय-पिंपळोद करणखेडा-सुंददें मार्गे नंदुरबार ला येईल.
- नवापुर आगाराची बस नवापुर बस स्थानकातून चिंचपाडा-विसरवाडी-खांतगाव खांडवारा भादवड ढेकवद मार्गे नंदुरबार ला येईल.
- अक्कलकुवा आगाराची बस शेजवा पुर्नवसन बोरद-तळवे आमलाण-तळोदा-हातोडा ब्रिज मार्गे-नंदुरबार ला येईल.
याशिवाय नंदुरबार बस स्थानकापासून श्री छत्रपती शिवाजी नाटयगृह नंदुरबार पर्यंत स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांग बांधवांनी या बसफेऱ्याचा लाभ घेऊन कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

