नाशिकमध्ये दोन ठिकाणी FDA चा छापा ; भेसळयुक्त पनीर व मिठाई जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अन्न व औषध प्रशासनाने शहरात दोन ठिकाणी छापा टाकून भेसळीच्या संशयावरून 59 हजार 450 रुपयांचा 224 किलोग्रॅमचा पनीर व मिठाईचा साठा जप्त करीत नष्ट केला.
अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त (अन्न) संजय नारागुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात बनावट व भेसळयुक्त पनीर विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार विभागाने देवळाली कॅम्पमधील आनंद रोड येथील मे. जसपालसिंग प्रीतीपालसिंग कोहली यांच्या पेढीची तपासणी केली. त्यात अस्वच्छ वातावरणात पनीरचा साठा साठविल्याचे आढळले. तसेच विनापरवाना पनीर उत्पादन करीत असल्याचेही उघडकीस आले. पनीर भेसळीच्या संशयावरून अन्न नमुना विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित १७१.५ किलो ग्रॅमचा 37 हजार 730 रुपये किमतीचा पनीरचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला. दुसऱ्या कारवाईत, देवळाली कॅम्प येथीलच मे. प्रशांत कोंडीराम यादव या स्वीट उत्पादक पेढीचीही तपासणी करण्यात आली. या पेढीत विनापरवाना अत्यंत अस्वच्छ वातावरणात पेढा, अंजीर बर्फी इत्यादी मिठाईचा साठा आढळला. भेसळीच्या संशयावरून या पेढीतील अन्न नमुना विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित ५३ किलो ग्रॅम वजनाचा 21 हजार 720 रुपये किमतीचा मिठाईचा साठा जप्त करण्यात आला. जप्त पनीर व मिठाई हे नाशवंत असल्याने ते नष्ट करण्यात आले आहे. तपासणीसाठी घेतलेल्या अन्न नमुन्यांचा विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 नुसार कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख, उमेश सूर्यवंशी आणि सहायक आयुक्त (अन्न) उ. सि. लोहकरे यांनी केली.
अन्न व्यावसायिकांनी अन्न पदार्थांत भेसळ करू नये. तसे करताना आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. अन्न व औषध दर्जा बाबत संशय असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क साधावा.
संजय नारागुडे, सहआयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन
हेही वाचा :