नाशिक : मेट्रो निओ अनिश्चिततेच्या गर्तेत! डिसेंबरअखेर प्रकल्पाची मुदत संपणार | पुढारी

नाशिक : मेट्रो निओ अनिश्चिततेच्या गर्तेत! डिसेंबरअखेर प्रकल्पाची मुदत संपणार

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

तत्कालिन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नाशिकमध्ये देशातील पहिली एलिव्हेटेड टायरबेस मेट्रो निओ प्रकल्प सुरू करण्याची घोषणा चार वर्षांपूर्वी मोठ्या थाटात केली गेली. यासाठी २०२१च्या केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूदही केली गेली. परंतू या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची डिसेंबर २०२३पर्यंतची मुदत संपण्यासाठी आता जेमतेम चार महिन्यांचाच कालावधी उरला असताना प्रकल्पाची अंमलबजावणी तर सोडाच मात्र यासंदर्भातील प्रस्तावाला देखील केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळू न शकल्याने हा प्रकल्प अनिश्चिततेच्या गर्तेत गेला आहे.

२०१७च्या महापालिका निवडणुकीपूर्वी तत्कालिन मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेत असल्याचे विधान केले होते. त्यांच्या सादेला प्रतिसाद देत नाशिककरांनी महापालिकेची सत्ता भाजपच्या हाती सोपविली. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी नाशिकमध्ये देशातील पहिली एलिव्हेटेड टायरबेस मेट्रो निओ सुरू करण्याची घोषणा शासनाकडून केली गेली. यासाठी २०२१च्या केंद्रीय अर्थसंकल्पात २०९२ कोटींची तरतूदही केली गेल्याने हा प्रकल्प लवकरच साकारला जाणार, असे चित्र रंगविण्यात आले होते. प्रकल्प खर्चात महाराष्ट्र सरकार, सिडको व महापालिकेला २५५ कोटी, केंद्र सरकार ७०७ कोटी रुपये तर १,१६१ कोटी रुपये कर्जाद्वारे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत सदर प्रकल्प साकारला जाईल, असे निश्चित करण्यात आले होते. ही मुदत संपण्यास आता जेमतेम चार महिन्यांचाच कालावधी शिल्लक असताना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पटलावर गेल्या दोन वर्षांपासून यासंदर्भातील फाईल प्रलंबित आहे. मुदत संपल्याने हा प्रकल्प आता अनिश्चिततेच्या गर्तेत गेला आहे. या प्रकल्पाला मंजुरी द्यावयाची झाल्यास खर्च वाढणार असून त्यासाठी नव्याने तरतूद करावी लागणार आहे.

राज्याचा प्रस्तावही प्रलंबित

मेट्रो निओची फाईल केंद्राकडून पुढे सरकत नसल्यामुळे नाशिककरांमध्ये निर्माण झालेली चलबिचल लक्षात घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारला नव्याने प्रस्ताव सादर करत नाशिकरोड ते सीबीएस यादरम्यान १०.४४ कि.मी. लांबीचा मेट्रो निओचा पहिला टप्पा राज्य शासनाच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यास परवानगी देण्याची विनंती केंद्राला केली होती. मात्र राज्य शासनाचा हा प्रस्ताव देखील केंद्राकडे प्रलंबित राहिला आहे.

पुढील आठवड्यात बैठक

दरम्यान, प्रकल्पाची मुदत संपुष्टात येत असल्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी चिंचा व्यक्त केली असून महामेट्रो, महारेल, व महापालिकेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पुढील आठवड्यात बोलविण्यात आली आहे. या बैठकीत या प्रकल्पाविषयी मंथन केले जाणार आहे. मेट्रो निओच्या डेपोसाठी सिन्नर फाटा व गंगापूररोड येथील कानेटकर उद्यानालगत तीन एकरचा मोकळा भूखंड देण्याची तयारी महापालिकेने दर्शविली आहे. मात्र प्रस्तावाची गाडी अद्याप पुढे सरकू न शकल्याने मेट्रो निओ धावणार कधी हा प्रश्न कायम आहे.

 हेही वाचा : 

Back to top button