Eye Flu : गरज पडल्यास विद्यार्थ्यांना सुटी द्या, शिक्षण विभागाने काढले पत्रक | पुढारी

Eye Flu : गरज पडल्यास विद्यार्थ्यांना सुटी द्या, शिक्षण विभागाने काढले पत्रक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये डोळे येण्याची साथ (Eye Flu)  सुरू झाली आहे. विषाणूजन्य असलेल्या या साथीने संसर्गजन्य आजार पसरण्याचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. डोळयांचा आजार हा सौम्य प्रकारचा संसर्ग असला तरी याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने शालेय विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली राहावी यासाठी शिक्षण विभागाला पत्र दिले आहे. शिक्षण विभागाने जिल्ह्यातील गट शिक्षण अधिकाऱ्यांना या आजारापासून संसर्ग वाढू नये यासाठी आदर्श नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना काही त्रास होत असल्यास त्यांना सुटी देण्याचे आदेश देण्यात आले आहे. डोळ्यांचा विषाणुजन्य संसर्ग हा मुख्यत्वे अॅडिनो व्हायरस मुळे होतो. याकरीता नियमित काळजी घेण्यात यावी, असे पत्रात म्हटले आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांना डोळे येण्याची साथ दिसून आल्यास विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यात येवू नये याबाबत वर्गशिक्षकांमार्फत पालकांना कळविण्यात यावे. एका विद्यार्थ्यामुळे दुसऱ्या विद्यार्थ्याला संसर्ग होण्याचा धोका असल्याने विद्यार्थ्यांनी नियमित हात धुणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे गरजेचे आहे. डोळे आलेल्या विद्याथ्यांमध्ये डोळे लाल होणे, वारंवार पाणी गळणे, डोळयाला सुज येणे अशी लक्षणे आढळताच विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या परवानगीने आजार बरा होईपर्यंत सुटी घ्यावी. ज्या भागात पावसामुळे चिकचिक घरगुती माश्या किंवा चिलटांचा प्रादुर्भाव असेल तेथे स्वच्छतेच्या आवश्यक उपाययोजना कराव्यात. Eye Flu

डोळयाचा हा संसर्ग सौम्य स्वरूपाचा असला तरी यामध्ये वैद्यकिय सल्ला घेण्यासाठी शाळेत जनजागृती करण्यात यावी. विद्यार्थी सुरक्षिततेची जवाबदारी सर्व स्तरावरून घेण्यात यावी. याबाबत सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी गटातील सर्व शाळांना त्वरीत लेखी स्वरूपात कळविण्यात आले असून त्वरीत अंमलबजावणी करावी असे आदेश देण्यात आले आहेत. Eye Flu

हेही वाचा :

Back to top button