Bank robbery Nashik : अंबड औद्योगिक वसाहतीत बँक लुटण्याचा प्रयत्न, पोलिसांचे सायरन वाजताच... | पुढारी

Bank robbery Nashik : अंबड औद्योगिक वसाहतीत बँक लुटण्याचा प्रयत्न, पोलिसांचे सायरन वाजताच...

नाशिक, सिडको  : पुढारी वृत्तसेवा

अंबड औद्योगिक वसाहतीत महामार्गालगत असलेल्या इंडियन बँकेच्या शाखेत गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बँकेच्या पाठीमागून खिडकीचे ग्रिल कापून प्रवेश केला. चोरट्यांनी आत प्रवेश केल्यानंतर लॉकर रूमच्यावरील स्लॅब ब्रेकर मशीनच्या सहाय्याने फोडत असताना अंबड पोलिस ठाण्याच्या गस्तीपथकाच्या वाहनांचा सायरन वाजल्याने चोरट्यांचा दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड औद्योगिक वसाहतीतील महामार्गालगतच्या हॉटेल वेलकमला लागूनच असलेल्या इंडियन बँकेत गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बँकेच्या पाठीमागील खिडकीचे ग्रिल कापून आत प्रवेश केला. लॉकर रूमच्यावरील स्लॅब ब्रेकर मशीनच्या सहाय्याने फोडून दरोडा टाकण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. परंतु रात्री अंबड पोलिस ठाण्याचे गस्ती वाहन सायरन वाजवत त्या परिसरात आल्याने चोरटे दरोडे टाकण्यासाठी लागणारे साहित्य सोडून पसार झाले. 

सकाळी बँकेचे कर्मचारी कामावर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. बँक अधिकाऱ्यांनी लॉकर आणि इतर कॅशची तपासणी केली असता कुठल्याही प्रकारची चोरी झाली नसल्याचे निष्पन्न झाले. याबाबत त्यांनी पोलिसांना कळवताच पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी, गुन्हे शाखेचे उपआयुक्त प्रशांत बच्छाव, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सीताराम कोल्हे, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, अंबड औद्योगिक वसाहत चुंचाळे पोलिस चौकीचे वरिष्ठ निरीक्षक मनोहर कारंदे, गुन्हे शाखा युनिट २ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित नलावडे आदी घटनास्थळी दाखल होत त्यांनी फॉरेन्सिक चमू व श्वानपथकाच्या सहाय्याने तपासणी केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. पुढील तपास चुंचाळे पोलिस चौकीचे वरिष्ठ निरीक्षक मनोहर कारंदे करत आहेत.

सुरक्षारक्षकच नाही

बँकेत रात्रीच्या वेळत सुरक्षारक्षकाची व्यवस्था नाही. तसेच बँकेचा सायरनदेखील वाजला नसल्याचे बँक कर्मचाऱ्यांनी सांगितले. बँकेच्या मागील बाजूला सीसीटीव्ही नसल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला.

हेही वाचा :

Back to top button