सरोज अहिरेंचा अजित पवार यांना पाठिंबा, म्हणाल्या विकासाठी सत्तेत राहणं गरजेचं

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क
नाशिकच्या राष्ट्रवादीच्या सहा आमदारांपैकी पाच आमदारांनी आपला पाठिंबा अजित पवार यांना जाहिर केला होता. मात्र देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली होती. अखेर सरोज अहिरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
विकासासाठी सत्तेत राहणे गरजेचे आहे. त्यामुळे आपला पाठिंबा हा अजित पवार यांना असल्याचे त्यांनी आज जाहिर केले. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सहाही आमदार आता अजित पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नाशिकमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम असून या कार्यक्रमासाठी अजित पवार हे वंदे भारत रेल्वेने नाशिकमध्ये आले असता त्यांच्या स्वागतासाठी सरोज अहिरे या देखील नाशिकरोड रेल्वेस्थानकात हजर झाल्या. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शरद पवारांनी वडिलांप्रमाणे प्रेम दिले व अजित पवार देखील भावासारखे आहेत. त्यामुळे वडिलांना पाठिंबा द्यायचा की भावला याबाबत कालपर्यंत संभ्रम होता. मात्र, मतदारसंघातील नागरिकांशी चर्चा केल्यानंतर अजित दादांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्या म्हणाल्या.