नाशिक : २५ लाखांच्या खंडणीसाठी प्राध्यापकाचे अपहरण, सहा जणांविरुद्ध गुन्हा | पुढारी

नाशिक : २५ लाखांच्या खंडणीसाठी प्राध्यापकाचे अपहरण, सहा जणांविरुद्ध गुन्हा

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

सपकाळ नॉलेज हबच्या प्राध्यापकाचे अपहरण करून जिवंत सोडण्याच्या बदल्यात 25 लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा त्र्यंबक पोलिस ठाण्यात सहा अनोळखी खंडणीखोरांविरुद्ध नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हसरूळ येथे सध्या वास्तव्यास असलेले प्रा. हरीशकुमार क्रिष्णन पद्यनाभन (वय 38) यांना १२ जून रोजी दुपारी बाराच्या सुमारास ते सपकाळ नॉलेज हब महाविद्यालयात असताना मोबाइलवर फोन आला. समोरून बोलणाऱ्या खंडणीखोराने तुम्हाला ठार करण्याची सुपारी आली असून, दोन दिवसांत ५० हजार रुपये द्या अन्यथा तुमची घरी एकटी असलेली आई जिवंत राहणार नाही, अशी धमकी दिली. १५ जूनला खंडणीखोराने द्वारका येथील एका हॉटेलवर दोन हस्तकांकरवी ५० हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर पुन्हा ते पैसे परत देण्याच्या बहाण्याने हरीशकुमार यांना २३ जूनला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जेलरोडवरील सैलानीबाबा येथे बोलावून घेत कारमध्ये बसवून त्यांचे अपहरण करून काही तास डांबून ठेवले. हरीशकुमार यांच्या फोनपेद्वारे वेळोवेळी १४ हजार ७९० रुपयांचे बिल अदा करून त्यांना सोडून दिले.

मात्र, जिवंत सोडण्याच्या बदल्यात २५ लाख रुपयांच्या खंडणीची धमकी दिली. भयभीत हरीशकुमार यांनी अखेर पोलिस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली आहे. त्र्यंबक पोलिसांनी सहा अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक अश्विनी टिळे पुढील तपास करत आहेत.

हेेही वाचा :

Back to top button