पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा
पिंपळनेर गावाच्या मध्यभागातून जाणाऱ्या पिंपळनेर सटाणा रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी अपर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले. दरम्यान ७ दिवस वेळ द्या काम सुरू करतो असे आश्वासन अपर तहसीलदार रवींद्र शेळके यांनी ग्रामस्थांना दिले.
पिंपळनेर गावातून जाणाऱ्या पिंपळनेर ते सटाणा या अवघ्या दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना वाहनधारकांचा तारेवरची कसरत करावी लागते. यापूर्वीही ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन केले होते. त्यावेळी दोन दिवसांत काम करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात रस्त्याचे काम सुरू झालेच नाही. त्यामुळे रस्ताप्रश्नी ग्रामस्थांची सोमवारी सायंकाळी ७ वाजता श्रीस्वामी समर्थ मंदिरात बैठक झाली.
या बैठकीत ग्रामस्थांनी पिंपळनेर सटाणा रस्त्याचे काम थांबले आहे या संदर्भात मते व्यक्त केली. काहींनी संतप्त व्यक्त करीत आमदार, खासदारांनी या रस्त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त केली. रस्ता प्रश्न प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढण्याचा निर्णय झाला .त्यानुसार सकाळी ११ वाजता ग्रामपंचायतीपासून मोर्चाला सुरुवात झाली.
यावेळी रस्त्यावरील खड्यांना रांगोळ्या काढल्या होत्या. ग्रामपंचायत विश्वनाथ चौक, खोलगल्ली, गांधी चौकमार्गे मोर्चा अपर तहसील कार्यालयावर पोहोचला. यावेळी अपर तहसीलदार रवींद्र शेळके यांनी ग्रामस्थांना ७ दिवस वेळ द्या रस्त्याचे काम सुरू करतो असे आश्वासन देिले. जिल्हाधिकारी यांनी ही हा प्रश्न गंभीरतेने घेतला आहे. भूमी अभिलेख एमएसआरडी च्या अधिकारी यांना बोलवले आहे. ते मोजणी करून नोटीस देऊन अतिक्रमण काढतील अशी माहिती दिली. यावेळी सरपंच, पं.स.सदस्य, ग्रा.पं सदस्य सर्वपक्षीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.