जळगाव : हरवलेली मुले सुखरुप पालकांच्या स्वाधीन, एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

जळगाव : जळगाव तालुक्यातील रायपूर कुसुंबा गावातील लहान मुले खेळता-खेळता बेपत्ता झाली होती. पालकांनी त्यांचा शोध घेतला असता, मुले सापडली नाहीत. त्यामुळे पालकांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत माहिती दिली. यानंतर पोलिसांनी शोध घेऊन मुलांना पालकांच्या स्वाधीन केले. आपली मुले सुखरुप मिळून आल्याने कुटूंबियांनी पोलिसांचे आभार मानले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कार्तीक जयसिंग परदेशी (वय ६) व प्रियांशु अजयकुमार वर्मा (वय ४) ही दोन्ही बालके खेळताना गुरुवारी सकाळी ११ वाजता बेपत्ता झाली होती. यात कार्तीक हा बालक मूकबधीर असल्याची पालकांची चिंता अधिकच वाढली होती. बालकांचा शोध सुरू असताना कानळदा रस्त्यावरील लक्ष्मीनगर येथील रहिवासी रीजवान शेख गणी यांनी एमआयडीसी पोलिसांशी संपर्क करीत हरवलेल्या बालकांची माहिती दिली. यानंतर पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, हवालदार ईम्तीयाज खान, ईम्रान सैय्यद, सचिन पाटील, महिला पोलीस नाईक निलोफर सैय्यद, साईनाथ मुंढे आदींनी चिमुकल्यांचा ताबा घेतला. दरम्यान, मन्यारखेडा रस्त्यावर दोन्ही बालके कासावीस झाल्याने रडत असताना सहायक फौजदार अतुल वंजारी यांनी दोन्ही बालकांना खाऊ देत त्यांच्या डोक्यावर मायेने हात फिरवत हात फिरवून त्यांना शांत केले. बालकांना पोलीस ठाण्यात पालक आणल्यानंतर त्यांना पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह रीजवान शेख यांच्या उपस्थितीत त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
हेही वाचा :