नाशिक क्राईम : भररस्त्यात हिसकावला पाच लाखांचा ऐवज | पुढारी

नाशिक क्राईम : भररस्त्यात हिसकावला पाच लाखांचा ऐवज

नाशिक : दुचाकीस्वार चोरट्यांनी एकाकडील सोन्याचे दागिने, कागदपत्रे व किमती ऐवज लंपास केल्याची घटना जिल्हा न्यायालयासमोरील शिवाजी स्टेडियमजवळ घडली. मनोज विठ्ठल महाजन (४१, रा. भाभानगर) यांच्या फिर्यादीनुसार सोमवारी (दि.१५) सकाळी १०.४५ वाजता दुचाकीस्वार चोरट्यांनी मनोज यांच्या बॅगेतील ४ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज हिसकावून नेला आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून एकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात अत्याचार करणाऱ्याविरोधात पोक्सोसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४ ते ८ मे दरम्यान, आरोपीने पीडितेवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

देवळाली कॅम्पला तरुणावर प्राणघातक हल्ला

नाशिक : देवळाली कॅम्प परिसरात एकाने रिहान ऊर्फ राहिल लियाकत सैयद (३१, रा. देवळाली कॅम्प) याच्यावर प्राणघातक हल्ला केला. रिहान यांच्या फिर्यादीनुसार संशयित प्रकाश उन्हवणे (रा. देवळाली कॅम्प) याने कुरापत काढून धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी देवळाली पोलिस तपास करीत आहे.

वाहनाने कट मारल्याने महिलेचा मृत्यू

नाशिक : वाहनाने कट मारल्याने दुचाकीवरून पडल्याने सुरेखा शरद कोठावदे (५५, रा. पार्कसाईट, आडगाव शिवार) यांचा मृत्यू झाला. रविवारी (दि.१४) सुरेखा या दुचाकीवरून जात असताना त्या पडल्या. त्यांना त्यांचे पती शरद कोठावदे यांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

रेल्वेखाली सापडून युवक ठार

नाशिक : रेल्वे धडकेत अथर्व तुषार बलकवडे (२३, रा. विजयनगर, देवळाली कॅम्प) याचा मृत्यू झाला. अथर्व हा सोमवारी (दि.१५) सकाळी रेल्वे रुळ ओलांडत असताना त्यास रेल्वेचा धक्का लागून मृत्यू झाला. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

देवळाली कॅम्पला महिलेची आत्महत्या

नाशिक : देवळाली कॅम्प येथील विजयनगर परिसरात राहणाऱ्या विद्या बहिरू लोहकरे (३३) यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. सोमवारी (दि.१५) दुपारी दीड वाजता हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रभातनगरला घरात वृद्धाची आत्महत्या

नाशिक : दिंडोरी रोडवरील प्रभातनगर परिसरात राहणाऱ्या बाळू त्र्यंबक गोसावी (वय ६५) यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याचे आढळून आले. सोमवारी (दि.१५) रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

Back to top button