नाशिक : तब्बल 20 तासांनी सापडला बेपत्ता जवानाचा मृतदेह, मेंढी येथे अत्यंसंस्कार | पुढारी

नाशिक : तब्बल 20 तासांनी सापडला बेपत्ता जवानाचा मृतदेह, मेंढी येथे अत्यंसंस्कार

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

पत्नी व मुलांसह दुचाकीहून जाणा-या केंद्रीय राखीव सुरक्षा बलातील जवानाची दुचाकी गोदावरी उजव्या कालव्यात कोसळली होती. यात जवानाची पत्नी व दोन मुलांना वाचविण्यात यश आले होते.  कालव्यात बेपत्ता जवानाचा मृतदेह तब्बल २० तासांनंतर सापडला. पालकमंत्री दादा भुसे यांनी मदतकार्यासाठी घटनास्थळी ठाण मांडले होते, अतिरिक्त बचाव पथकांना पाचारण करून शोधमोहीम राबवली. जवान गिते यांना केंद्रीय राखीव सुरक्षा बलाच्या पथकाने रात्री उशिरा मानवंदना दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, पाटाचे पाणी लवकर बंद न केल्याने ग्रामस्थ व जवानाच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त करीत पालकमंत्री भुसे यांना घेराव घातला होता. गणेश सुकदेव गीते (३६, रा. मंबी, ता. सिन्नर) असे या जवानाचे नाव असून ते पत्नी, मुलांसह गावाकडे दुचाकीने येत असताना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील चोंढी शिवारात ही घटना घडली. गिते केंद्रीय राखीव सुरक्षा बलात कार्यरत होते. पंतप्रधानांच्या विशेष पथकात तैनात असताना २४ फेब्रुवारी रोजी ते सुट्टीवर आले होते. बुधवारी (दि. ८) गणेश हे पत्नी रूपाली (३०), मुलगी कस्तुरी (७) व मुलगा अभिराज (दीड वर्ष) यांच्यासह शिर्डी येथे दर्शनासाठी दुचाकीने गेले होते. शिर्डीहून परतत असताना नांदूरमध्यमेश्वर धरणातून गेलेल्या उजव्या कालव्याच्या बाजूने चोंढी शिवारात असलेल्या घराकडे जात असताना सायकांळी 6 च्या सुमारास मेंढी-ब्राम्हणवाडे रस्त्यावर तवंग परिसरात गणेशचा मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने मोटारसायकल उजव्या कालव्यात पडली. कालव्याला आवर्तन सुटलेले असल्याने मोटारसायकल पडण्याचा आवाज होताच जवळच असलेल्या नितीन रावसाहेब गीते यांनी धाव घेतली. पाण्यात पडल्यानंतर गणेश व नितीनने गणेशची पत्नी रुपाली, मुलगी कस्तुरी, व मुलगा अभिराज यांना बाहेर काढले. मात्र, पाण्याच्या प्रवाहात गणेश वाहून गेला. घटनेनंतर आदिवासी बांधवांसह स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत गणेशचा शोध सुरू केला. दुपारी एकच्या सुमारास पालकमंत्री दादा भुसे, प्रांताधिकारी अर्चना पठारे, पोलिस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे, तहसीलदार एकनाथ बंगाळे यांच्यासह सर्व  शासकीय अधिकारी घटनास्थळी तैनात होते. सकाळी 11 च्या सुमारास कालव्याचे पाणी बंद करण्यात आले. कालव्याचे पाणी कमी होऊ लागल्यानंतर शोध मोहिमेला वेग आला.

दरम्यान, मृतदेह सापडल्यानंतर पत्नी, मुलांसह गिते कुटुंबीय व नातेवाइकांनी हंबरडा फोडला. जवान गिते सुटी संपून शुक्रवारी कर्तव्यावर रुजू होणार होते.

नियोजित कार्यक्रमांना ना. भुसेंकडून फाटा

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित नाफेडची बैठक आणि निफाड तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा रद्द करून तातडीने सिन्नरला धाव घेतल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. आपण मागच्या सरकारमध्ये सैनिक कल्याण विभाग सांभाळला आहे. सैनिकांप्रती असणाच्या आदरभावामुळेच सर्व बैठका रद्द करून परिस्थिती हाताळण्यासाठी स्वतः आलो, जोपर्यंत बेपत्ता जवान सापडत नाही, तोपर्यंत आपण स्वतः इथेच थांबणार असल्याचे ना. भुसे यांनी सांगितले होते.

हेही वाचा :

Back to top button