नाशिक : वीरांच्या मिरवणुकांनी गोदाघाट गजबजला; बाशिंगे वीर ठरले सर्वांचेच आकर्षणबिंदू | पुढारी

नाशिक : वीरांच्या मिरवणुकांनी गोदाघाट गजबजला; बाशिंगे वीर ठरले सर्वांचेच आकर्षणबिंदू

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
रामकुंड परिसरात मंगळवारी (दि.7) सायंकाळी वीरांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लहान मुलांनी केलेल्या विविध महापुरुषांच्या वेशभूषांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पंचवटी पोलिसांनी रामकुंड तसेच गोदाघाट परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता.

वीर www.pudhari.news
नाशिक : होळीच्या दुसर्‍या दिवशी वीरांची मिरवणूक काढण्याची नाशिकमध्ये परंपरा आहे. जुन्या नाशिकमधील मानाच्या दाजीबा वीर मिरवणुकीतील बाशिंगे वीर आकर्षण बनलेले होते.  (छाया : रुद्र फोटो )

होळी सण साजरा केल्यानंतर दुसर्‍या दिवशी धूलिवंदनाला वीर नाचविण्याची परंपरा आहे. घरोघरी देव्हार्‍यात असलेले वीरांचे टाक खोबर्‍याच्या वाटीत ठेवून व लाल कापडात बांधून त्यांची मिरवणूक काढली जाते. त्यानुसार यंदाही मंगळवारी सायंकाळी वाजत गाजत विविधरंगी वेशभूषा करून लहान मुलांच्या मिरवणुका रामकुंडाच्या दिशेने येत होत्या. येथील होळीभोवती पाच प्रदक्षिणा करून नंतर रामकुंडात गोदापूजन करून चिमुकले व भाविक माघारी फिरत होते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात हे वीर विशिष्ट प्रकारचा नाच करीत होळी भोवती फेर धरत होते. यानंतर घरोघरी तळी भरून खोबर्‍याचा प्रसाद वाटप केला जात होता. भगवान शंकर, श्रीराम, हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज, मावळे अशा विविध प्रकारच्या वेशभूषा करण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत होते. यासह डोक्यात फेटा, टोपी घालून व गळ्यात फुलांचे हार घालण्यात आले होते. यावेळी येथील वातावरणात चैतन्य निर्माण होऊन, अबालवृद्धांच्या चेहर्‍यावर आनंदी भाव उमटल्याचे पाहायला मिळाले. यानिमित्ताने रामकुंडावर विविध खेळण्यांची छोटी मोठी दुकाने थाटली होती. पंचवटी विभागात असलेले नांदूर गाव, मानूर, आडगाव, म्हसरूळ, मखमलाबाद, हिरावाडी यासह आदी भागात वीरांच्या मिरवणुका काढण्यात आल्या.

वीर www.pudhari.news
नाशिक : होळीच्या दुसर्‍या दिवशी वीरांची मिरवणूक काढण्याची नाशिकमध्ये परंपरा आहे. बाशिंगे वीर म्हणून त्यांची ख्याती असते. असे काही मिरवणुकीतील वीर. (छाया : रुद्र फोटो )

वीर www.pudhari.news

वीर www.pudhari.news

 

Back to top button