नाशिक : पोलिस असल्याची बतावणी करून वृध्दाकडून लूटले दिड तोळे सोने | पुढारी

नाशिक : पोलिस असल्याची बतावणी करून वृध्दाकडून लूटले दिड तोळे सोने

नाशिक (नांदूरशिंगोटे) : पुढारी वृत्तसेवा
येथे चास रस्त्यालगत महावितरण कार्यालय परिसरात अज्ञात चोरट्यांनी पोलिस असल्याची बतावणी करत वृद्धाकडील दीड तोळ्याची सोन्याची चेन लांबवल्याची घटना गुरुवारी (दि. 8) दुपारी 1 च्या सुमारास घडली.

म्हाडा कॉलनीत मोठ्या प्रमाणावर वसाहती निर्माण झाल्या आहे. दुपारच्या सामसूम असल्याचा गैरफायदा घेऊन हेल्मेट घातलेल्या दोन दुचाकीस्वारांनी नामदेव रभाजी शिंदे यांना लुबाडले. ते घराबाहेर ओट्यावर बसलेले असताना दोन भामट्यांनी ‘बाबा, आम्ही पोलिस आहोत. गावामध्ये चोरट्यांनी एक जणावर चाकूचा वार करून त्याची गळ्यातील सोन्याची चेन चोरून नेली आहे, तेव्हा तुम्ही तुमच्या गळ्यातील चेन काढा व खिशात ठेवा’, असे खोटे सांगितले. शिंदे यांना ही घटना खरी वाटली. एका चोरट्याने स्वत:च्या गळ्यातील चेन काढून खिशात ठेवण्याचे नाटक केले व दुसर्‍याने शिंदे यांच्या हातातील सोन्याची चेन कागदात बांधून देतो असे म्हणत, त्यांच्या हातावर कागदामध्ये छोटे छोटे दगड ठेवून चोरटे शिंदे यांची सोन्याची चेन घेऊन पसार झाले. हा प्रकार लक्षात येताच शिंदे चोर चोर म्हणून ओरडले. मात्र, आसपास कोणीही नसल्यामुळे चोरटे फरार झाले. नांदूर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी धाव घेतली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे असून आपल्या भागामध्ये कोणी अनोळखी व्यक्तींचा वावर असेल, तर तत्काळ माहिती देण्याचे आवाहन नांदूरशिंगोटे पोलिस दूरक्षेत्राच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा:

Back to top button