धुळे : अंत्यविधीहून परतताना काळाचा घाला; बालिकेचा मृत्यू, आई-वडील गंभीर | पुढारी

धुळे : अंत्यविधीहून परतताना काळाचा घाला; बालिकेचा मृत्यू, आई-वडील गंभीर

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे ते चाळीसगाव मार्गावर रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शिंदखेडा तालुक्यातील पिंपराळा येथील बालिकेस दुचाकी अपघातात आपला प्राण गमवावा लागला. या अपघातात मयत बालिकेचे आई आणि वडील हे देखील जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शिंदखेडा तालुक्यातील नरडाणे नजीक पिंपराळा गावात राहणारे तुषार त्र्यंबक भामरे हे चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड येथे अंत्यविधीसाठी एम एच 18 ए आर 27 78 क्रमांकाच्या दुचाकीने आले होते. अंत्यविधी आटोपल्यानंतर तुषार भामरे हे त्यांची पत्नी हेमांगी आणि दोन वर्ष वयाची मुलगी गीतांजली यांच्या समवेत धुळे चाळीसगाव मार्गाने शिंदखेडा तालुक्यातील आपल्या घराकडे परत येण्यासाठी निघाले. या दुचाकीने भामरे हे दहीवद फाट्यापर्यंत आले. रस्त्याची दुरावस्था झालेली असल्यामुळे रस्त्यावरील खड्डे टाळून वाहन चालत असतानाच चाळीसगाव कडून धुळ्याकडे येणाऱ्या जि जे 06 ए व्ही ७३२९ क्रमांकाच्या टँकरने या दुचाकीचा धडक दिली. त्यामुळे हेमंगी भामरे यांच्या मांडीवर असलेली गीतांजली दुचाकीवरून खाली पडली. तर तुषार भामरे आणि हेमांगी भामरे या देखील रस्त्यावर खाली पडले. दरम्यान गीतांजली हिला टँकरने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

घडलेला प्रकार पाहून तुषार भामरे आणि त्यांची पत्नी हे हादरले. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यामुळे शेतात काम करणारे शेतमजूर आणि शेतकरी मदतीसाठी धावून आले. यावेळी टँकर चालकाने गाडी सोडून तिथून पळ काढला. या घटनेनंतर नागरिकांनी भामरे दाम्पत्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान या अपघाताची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Back to top button