नाशिक : सव्वा लाख सदोष तिरंग्यांची महापालिकेने रोखली विक्री | पुढारी

नाशिक : सव्वा लाख सदोष तिरंग्यांची महापालिकेने रोखली विक्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत महापालिकेतर्फे मुख्यालयासह सहाही विभागीय कार्यालयांत तिरंगा ध्वज वितरण सुरू असतानाच महापालिकेला प्राप्त झालेल्या दोन लाख तिरंग्यांपैकी सव्वा लाख तिरंग्यांमध्ये दोष आढळून आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेप्रमाणे संबंधित सदोष तिरंग्यांची विक्री थांबविण्यात आली आहे. नव्याने खासगी आस्थापनाकडून एक लाख तिरंगा खरेदी करण्यात आल्याची माहिती उपआयुक्त विजयकुमार मुंडे यांनी दिली.

आजादी का अमृत महोत्सव या अभियानाच्या अनुषंगाने ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार नाशिक महापालिकेला दोन लाख तिरंगा वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेला दोन लाख तिरंगा प्राप्त झाले. मनपाच्या राजीव गांधी भवन या मुख्यालयासह सहा विभागीय कार्यालयांत त्यांचे वितरण करण्याची व्यवस्था करण्यात आली असून, गेल्या आठ दिवसांत जवळपास 48 हजार नागरिकांनी तिरंगा खरेदी केले आहेत. महापालिकेला प्राप्त झालेल्या दोन लाख तिरंग्यांपैकी सव्वा लाख तिरंगा सदोष असल्याचे समोर आले असून, या ध्वजांमध्ये तिन्ही रंगांचा आकार एकसमान नाहीत. ध्वजाचे कापड निकृष्ट दर्जाचे आहे. ध्वजाच्या लांबी-रुंदीमध्ये अनियमितता असल्याच्या तक्रारी आल्याने मनपाने या सदोष झेंड्यांचे वितरण थांबविले. सव्वा लाख झेंडे मनपाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे परत पाठविले आहेत.

नाशिक महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात सदोष ध्वज विक्री होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आल्याने, या पार्श्वभूमीवर सदोष ध्वजाचे वितरण करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सदोष तिरंग्यांचे वितरण न करण्याचे आवाहन करत तसे झाल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.

हेही वाचा :

Back to top button