नाशिकचे पालकमंत्रिपद महाजनांकडे? नावाची होतेय जोरदार चर्चा | पुढारी

नाशिकचे पालकमंत्रिपद महाजनांकडे? नावाची होतेय जोरदार चर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भाजप-शिंदे गटाच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्याने त्यात उत्तर महाराष्ट्राला पाच मंत्रिपदे मिळाली आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यापूर्वीच नाशिकचे पालकमंत्री कोण असणार, याबाबत चर्चा सुरू असून, माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याच हाती नाशिकची सूत्रे देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी नाशिक महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संकटमोचक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

महाविकास आघाडी सरकार कोसळल्याने राज्याच्या सत्तेवर आलेल्या भाजप-शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. या सत्तास्थापनेच्या तब्बल एक महिन्यानंतर मंगळवारी (दि.9) मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून, त्यात 18 मंत्र्यांचा समावेश आहे. या 18 मंत्र्यांपैकी राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन, विजयकुमार गावित, दादा भुसे आणि गुलाबराव पाटील या उत्तर महाराष्ट्रातील पाच आमदारांना कॅबिनेट दर्जाची मंत्रिपदे देण्यात आली आहेत. यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची मानली जात आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना नाशिकचे पालकमंत्रिपद कुणाकडे जाणार याविषयी जोरदार चर्चा असून, माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पालकमंत्री पदाकडे पाहिले जात असून, महापालिकेतील सत्ता राखण्यात महाजन यांचा मोठा वाटा मानला जातो. यामुळे त्यांच्याकडे संकटमोचक म्हणून पाहिले जाते. भाजपचा नाशिक मनपातील अडीच वर्षांचा कालावधी संपल्यानंतर पुढील अडीच वर्षांत भाजपकडून सत्ता काढून घेण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने भाजपमधील अंतर्गत वादाचा फायदा घेऊन नगरसेवक फोडण्याकरता प्रयत्न केले होते. मात्र महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीच्या आदल्या रात्रीच गिरीश महाजन यांनी राजकीय कांडी फिरवून नाशिकमधील सत्ता कायम राखण्यात यश मिळविले. यामुळे आगामी निवडणुकीच्या अनुषंगानेदेखील महाजन यांच्याच हाती सूत्रे जाण्याची शक्यता असल्याने पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडेच कारभार जाणार असल्याचे पक्के झाले. याशिवाय नाशिक शहर भाजपमधील पदाधिकारी आणि मनपातील माजी पदाधिकार्‍यांमध्ये अंतर्गत वाद होऊनही त्यांना निवडणुकीच्या तोंडावर एकसंध ठेवण्याचे काम महाजन यांच्यावरच सोपविण्यात आले होते. यामुळे येणार्‍या निवडणुकीतही महाजन यांचीच मोठी भूमिका असेल.

देवयानी फरांदे यांच्या नावाची चर्चा : पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर होणार्‍या मंत्रिमंडळात नाशिक मध्यच्या आमदार तथा भाजप प्रदेश सरचिटणीस प्रा. देवयानी फरांदे यांच्याही नावाची चर्चा सुरू असून, डॉ. राहुल आहेर आणि अ‍ॅड. राहुल ढिकले यांच्याकडूनही मंत्रिपदासाठी प्रयत्न केले जात आहे. तर शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे.

Back to top button