नाशिक : महापालिका ‘इतके’ तिरंगा ध्वज विक्री करणार, लाखो घरांवर फडकणार तिरंगा

नाशिक : महापालिका ‘इतके’ तिरंगा ध्वज विक्री करणार, लाखो घरांवर फडकणार तिरंगा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्ताने 'आझादी का अमृत महोत्सव'अंतर्गत केंद्र शासनाने विविध उपक्रम हाती घेतले असून, या उपक्रमांतर्गत हर घर झेंडा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून महापालिकेच्या माध्यमातून सहाही विभागीय कार्यालयांतून दोन लाख तिरंगा ध्वजांची विक्री करण्यात येणार आहे. एका ध्वजासाठी 21 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत 'हर घर झेंडा' उपक्रम राबविण्यात येणार आहे. नाशिक विभागातील शहरी व ग्रामीण भागातील घरांची एकूण संख्या 38 लाख 51 हजार 651 इतकी असून, या प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून त्याचे नियोजन केले जात आहे. या नियोजनाच्या अनुषंगाने मनपाने दोन लाख तिरंगा ध्वजाची मागणी नोंदविली होती. येत्या दोन दिवसांत महापालिकेकडे अहमदाबाद येथून ध्वज प्राप्त होणार आहेत. तिरंगा ध्वज नागरिकांना उपलब्ध व्हावे यासाठी मनपाने आपल्या सिडको, सातपूर, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, पंचवटी व नाशिकरोड या सहाही विभागीय कार्यालयांत विक्री केंद्राची व्यवस्था केली आहे. 30 इंच रुंद आणि 20 इंच लांबी असलेल्या एका ध्वजाकरता 21 रुपयांचे शुल्क नागरिकांकडून आकारले जाणार आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागरिकांच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तसेच देशभक्ती तेवत रहावी आणि या लढ्यातील क्रांतिकारकांचे स्मरण व्हावे. यादृष्टीने अमृत महोत्सवांतर्गत 'हर घर झेंडा' उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अभियानाबाबत प्राधिकृत सनियंत्रण प्रणाली तयार करण्यात आली असून, त्यानुसार झेंड्यांचे वितरण सुरळीतपणे करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. डोनेशन पद्धतीनेदेखील मोठ्या प्रमाणात जिल्हास्तरावर झेंडे उपलब्ध करून दिले जात आहे.

24 तास फडकणार तिरंगा
भारतीय ध्वजसंहितेमध्ये 30 डिसेंबर 2021 च्या आदेशान्वये काही प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यानुसार पॉलिस्टर व यंत्राद्वारे तयार करण्यात आलेले झेंडे लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच या अभियानामध्ये झेंडा फडकविल्यानंतर तो दिवस व रात्र 24 तास फडकविण्यात येणार आहे. अभियान दि. 13 ते 15 ऑगस्ट असे तीन दिवस राबविण्यात येणार आहे. या कालावधीत तिरंग्याचा अवमान होणार नाही, याची काळजी संबंधित प्रत्येक कुटुंब तसेच नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news