नाशिक : प्रारूप याद्यांत घोळ करणारे महापालिकेचे कर्मचारी रडारवर, चूक दुरुस्तीची संधी | पुढारी

नाशिक : प्रारूप याद्यांत घोळ करणारे महापालिकेचे कर्मचारी रडारवर, चूक दुरुस्तीची संधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मनपा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयाद्यांमध्ये काही कर्मचार्‍यांच्या चुकांमुळेच गोंधळ निर्माण झाल्याची अप्रत्यक्ष कबुली मनपा आयुक्त रमेश पवार यांनी दिली. यादीतील चुका सुधारण्यासाठी संबंधित कर्मचार्‍यांना संधी देण्यात आली असून, त्यानंतरही चुका राहिल्यास संबंधित कर्मचार्‍यांचे निलंबन, बडतर्फी आणि प्रसंगी फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा इशाराच आयुक्तांनी दिला.

प्रारूप मतदारयाद्यांमध्ये मोठ्या स्वरूपावर चुका झालेल्या आहेत. एक-एका प्रभागातून जवळपास दोन हजारापासून ते आठ हजार इतकी नावे अन्य प्रभागांमध्ये समाविष्ट झाल्याच्या तक्रारी मनपाच्या निवडणूक विभागाकडे प्राप्त झालेल्या आहेत. विशिष्ट राजकीय पक्षांच्या दबावाखाली मतदारयाद्या तयार करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून, भाजपने तसा थेट आरोप शिवसेना, राष्ट्रवादीवर केला आहे. यामुळे आता प्रशासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले असून, प्रारूप मतदारयाद्यांवर 3,847 इतक्या हरकती प्राप्त झाल्या आहेत. प्रत्येक हरकतींची छाननी, प्रत्यक्ष स्थळ पाहणी, पंचनामा आणि दुरुस्ती करण्यासाठी जादा कालावधी लागणार असल्याने मतदारयाद्या अंतिम करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सात दिवसांचा कालावधी वाढवून दिला आहे. त्यामुळे आता 16 जुलैपर्यंत अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करता येणार आहेत. या आधी हीच मुदत 9 जुलैपर्यंत होती. हरकतींची संख्या आणि राजकीय आरोपामुळे आयुक्त रमेश पवार यांनी निवडणूक शाखेत काम करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांची बैठक घेत याद्यांमध्ये जाणीवपूर्वक चुका करणार्‍या कर्मचार्‍यांना कारवाईचा इशारा दिला. स्वत: आयुक्त प्रत्येक विभागातील काही प्रभागांमध्ये स्थळ पाहणी करून नागरिक तसेच लोकप्रतिनिधींशी संवाद साधून माहिती घेत आहेत.

काही कर्मचार्‍यांच्या चुकांमुळे प्रभागाच्या सीमा रेषेवरील शेकडो मतदारांची नावे लगतच्या प्रभागातील मतदारयादीत समाविष्ट झाली आहेत. तसेच एका प्रभागातील विशिष्ट भागातील मतदारयादीचा संपूर्ण भागच दुसर्‍या प्रभागातील मतदारयादीला जोडला गेल्याची माहितीही समोर आली आहे.

चुकीच्या हरकती घेणार्‍यांवरही लक्ष
चुकीची हरकत घेऊन प्रशासनाचा वेळ वाया घालविणार्‍या हरकतदारांवरही आयुक्त नजर ठेवून आहेत. यामुळे अशा हरकतदारांनाही कारवाईला सामोरे जावे लागू शकते. राज्य निवडणूक आयोगाकडे संबंधित हरकतदारांची माहिती दिली जाणार असल्याचे आयुक्त पवार यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button