नाशिकमधील ‘या’ चार ग्रामपंचायतींची रेनवॉटर हार्वेस्टिंग साठी निवड | पुढारी

नाशिकमधील 'या' चार ग्रामपंचायतींची रेनवॉटर हार्वेस्टिंग साठी निवड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
माझी वसुंधरा योजनेंतर्गत नाशिक तालुक्यातील चांदशी, दरी, मातोरी व यशवंतनगर या चार ग्रामपंचायतींची रेनवॉटर हार्वेस्टिंग (पाऊस पाणी संकलन) साठी निवड करण्यात आल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांनी दिली. या चार गावांमधील सर्व शासकीय कार्यालये, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय यांसह गावातील घरांवर पाऊस पाणी संकलनासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी पाऊस पाणी संकलन (रेनवॉटर हार्वेस्टिंग) या उपाययोजनांची कामे करून या ग्रामपंचायती नाशिक जिल्ह्यासाठी आदर्श ग्रामपंचायती ठराव्यात, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे, गृहभेटीचे आयोजन करणे, महिला सभा, ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांची सभा घेणे या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या गावांमध्ये कामे केली जाणार असून, त्यासाठी 15 वा वित्त आयोग व रोजगार हमी योजना यांचा समन्वय साधून निधी उपलब्ध केला जाईल, असेही उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांनी सांगितले. तसेच गरज पडल्यास लोकवर्गणीही जमा केली जाणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या सूचनांनुसार पाऊस पाणी संकलनासाठीच्या या अभिनव उपक्रमाचे नियोजन व संनियंत्रणासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत कर्मचार्‍यांना प्रत्येक गावाची जबाबदारी देण्यात आली आहे. या कर्मचार्‍यांनी आठवड्यातील किमान दोन दिवस क्षेत्रभेटी कामे पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविल्याचे वर्षा फडोळ यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button