नाशिक : ना. आदित्य ठाकरे पुढील आठवड्यात जिल्हा दौर्‍यावर | पुढारी

नाशिक : ना. आदित्य ठाकरे पुढील आठवड्यात जिल्हा दौर्‍यावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरडशेत येथील पाण्याची समस्या सोडविल्यानंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे येत्या 12 व 13 मे रोजी नाशिक जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. दुष्काळग्रस्त तालुके म्हणून ओळख असलेल्या येवला, चांदवड, कळवण, सुरगाणा या तालुक्यांमधील काही गावांना ते भेट देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यासह सुरगाणा, दिंडोरी या आदिवासीबहुल गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या गावांना पाणी पुरविणार्‍या शासकीय योजनांची सद्यस्थिती काय आहे, याविषयी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची शुक्रवारी (दि. 6) भेट घेतली. त्यांनी पाणीपुरवठा योजनांचा आढावा जाणून घेतला. शासकीय योजनांची कामे वेळेत कशी पूर्ण होतील, यादृष्टीने शिवसेना पाठपुरावा करणार आहे. तसेच शिवसेना स्वनिधीतून काही कामे करणार आहे. ज्या गावांमध्ये पाण्याचे स्रोत नाहीत, अशा गावांमध्ये पाण्याच्या टाक्या पुरविल्या जातील. तसेच सार्वजनिक विहिरींमध्ये पाणी कसे पुरविले जाईल, याचेही नियोजन केले जाणार आहे.

शुक्रवारी त्र्यंबकेश्वरला
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे शुक्रवारी (दि. 13) त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेणार आहेत. तसेच मुंबईला जाताना इगतपुरी तालुक्यातील काही गावांना भेट देणार आहेत.

हेही वाचा :

Back to top button