नाशिक: रुग्णाच्या तक्रारीवरून वैद्यकीय अधिकारी सेवामुक्त | पुढारी

नाशिक: रुग्णाच्या तक्रारीवरून वैद्यकीय अधिकारी सेवामुक्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या निफाड तालुक्यातील नैताळे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्याकडे केलेल्या रुग्णाच्या तक्रारीवरून कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यास सेवामुक्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर परिचारिका व परिचर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

नैताळे प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी (दि.१६) दुपारच्या वेळी रुग्ण तपासणीसाठी आला असता आरोग्य केंद्रात सेविका व्यतिरिक्त कोणीही अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे संतप्त रुग्णाने थेट मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांच्याकडे तक्रार दाखल केली. सदर तक्रारीची तत्काळ दखल घेत बनसोड यांनी शहानिशा करत माहिती घेतली. संबंधित वैद्यकीय अधिकारीने कोणताही अनुपस्थित असल्याचा अर्ज न देता किंवा कोणालाही न सांगता रजेवर असल्याचे लक्षात आल्याने परिचारिका व परिचर यांनी देखील कामात हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर, गैरहजर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यास लगेचच बोलावून घेत चौकशी करण्यात आली. वैद्यकीय अधिकारीची बाजू ऐकून घेतल्यानंतर ते दोषी असल्याचे आढळल्याने सेवामुक्तीची कारवाई अवलंबण्यात आली. या कारवाईचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून ग्रामीण भागात कामचुकारपणा करणाऱ्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, संबंधित रुग्णास तत्काळ उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी पाठवण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी देत एका तासाच्या आत संबंधित रुग्णावर उपचार करण्यात आले.

हेही वाचा:

 

Back to top button