नाशिक : …म्हणून त्र्यंबक तालुक्यातील 25 विहिरींवर बसवल्या संरक्षक जाळ्या | पुढारी

नाशिक : ...म्हणून त्र्यंबक तालुक्यातील 25 विहिरींवर बसवल्या संरक्षक जाळ्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील 25 सार्वजनिक विहिरींवर संरक्षक जाळ्या बसविण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली. नागरिकांची सुरक्षा, वन्यजीव कायद्यातील तरतूद या कारणांमुळे या जाळ्या बसविल्या असून, उर्वरित विहिरींवरही लवकरच जाळ्या बसविल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

उन्हाची तीव्रता वाढल्याने आदिवासी भागातील विहिरी तळ गाठतात. त्यामुळे महिलांना हंडाभर पाणी मिळविण्यासाठी खोल विहिरींमधून पाणी काढण्याची कसरत करावी लागते. प्रत्येक घराला नळाने पाणी देण्यासाठी सरकारकडून जलजीवन मिशन ही योजना राबविली जात असली, तरी ही योजना अद्याप प्रशासकीय मान्यतेच्या पातळीवर असून, योजना पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षे लागणार आहेत. त्यामुळे या गावांमध्ये पाणीपुरवठा योजना नाही. याबाबतचे व्हिडिओ सोशल मीडिया तसेच इतर माध्यमांमधून समोर आल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाची धावपळ होते. या वर्षीही असे व्हिडिओ समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या विहिरींवर पाण्याच्या टाक्या बसवून नळाने पाणी देण्याची सुविधा केली आहे. मात्र, व्हिडिओ काढण्यासाठी महिलांना विहिरींमध्ये उतरविण्याचे प्रकार समोर आल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने सर्व विहिरींवर जाळ्या बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

या साहसी व्हिडिओंच्या खेळात एखाद्याच्या जीवावर बेतू शकते, त्यामुळे सर्व सार्वजनिक विहिरींवर जाळ्या बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. वन्यजीव कायद्यानुसार, वन्यजीवांच्या संरक्षणासाठी सार्वजनिक विहिरींवर संरक्षक जाळ्या बसविणे बंधनकारक असल्याने या जाळ्या बसविल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button