नंदुरबार ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील सारंगखेडा यात्रेला प्रशासनाने कोरोनामुळे फाटा दिला असला, तरी घोडेबाजाराला मात्र परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा घोडेबाजार भरला असून, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. तब्बल पाच कोटींपर्यंतचे घोडे दाखल झाल्याने या बाजारात कोट्यवधींची उलाढाल होण्याचा अंदाज आहे.
सारंगखेडा येथील घोडेबाजारात 1 हजार 119 घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. कोरोनामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर प्रशासनाने नियम व अटींच्या अधीन राहून घोडेबाजाराला परवानगी दिली आहे. 'रावण', 'रुस्तम', 'नुकरा' आणि 'बुलंद' यांसारख्या कोट्यवधी रुपये किमतीच्या घोड्यांमुळे यंदाचा बाजार अधिकच लक्षवेधी ठरला आहे.
'रावण' नामक घोड्याची पाच कोटी, रुस्तमची दीड कोटी, तर बुलंदची किंमत एक कोटी रुपये सांगितली जात आहे. 'रावण'चे मालक असद सैयद यांनी दहा घोडे विक्रीसाठी आणले आहेत. अन्य घोडेविक्रीच्या माध्यमातून परंपरागत पद्धतीने लाखो रुपयांची उलाढाल सुरू आहे. घोडेबाजार 20 दिवस सुरू राहील, असे आयोजक जयपाल रावल यांनी सांगितले.