आस्थेला धक्का बसत आहे, तुटेपर्यंत ताणू नका; शरद पवारांकडून एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन | पुढारी

आस्थेला धक्का बसत आहे, तुटेपर्यंत ताणू नका; शरद पवारांकडून एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

नाशिक; पुढारी ऑनलाईन

एसटी संप दिवसागणिक चिघळत चालल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन करताना अप्रत्यक्ष विलिनीकरणाचा मुद्दा त्यांनी अप्रत्यक्ष बाजूला ठेवला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत परिवहन मंत्र्यांनी माहिती दिली असल्याचे ते म्हणाले.

त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करताना म्हटले आहे की, परिवहन मंत्र्यांनी मला सांगितले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत. त्यातील एक मागणी वगळता इतर सर्व प्रश्नांवर वाटाघाटी झालेल्या आहेत. मात्र विलीनीकरणाच्या प्रश्नावर एकमत झालेले नाही.
ज्या संस्थेत आपण कामाला लागलो, त्या संस्थेतून इतर ठिकाणी आपली नोकरी वर्ग करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत, याबद्दल कुणाचेही दुमत नाही. पण विलीनीकरणाचा मुद्दा आज प्रथमदर्शनी तरी योग्य आहे, असे मला वाटत नाही.

एसटीचा इतके दिवस संप सुरू आहे. त्यात न्यायालयाचाही निकाल येत आहे. तरीही संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेणे म्हणजे एकप्रकारे कामगारांचे नुकसान करण्याला मदतच करण्यासारखे आहे. म्हणून राज्य सरकार आणि एसटीच्या प्रातिनिधिक आणि अन्य संघटनांनी एकत्र बसून यातून मार्ग काढला पाहिजे.

हा संप थांबला पाहिजे. नागरिकांच्या यातना वाढलेल्या आहेत. कार्तिकी एकादशीला शेकडो बस जात असतात. आज भाविकांना दर्शन घेण्यासाठी जाताना अडचणी निर्माण होत आहेत.

गेली अनेक वर्षे अत्यंत सेवभावी वृत्तीने एसटीने काम केले, त्याबद्दल लोकांच्या मनात आस्था आहे. या आस्थेला कुठेतरी धक्का पोहचत आहे. ताणावे, पण तुटेपर्यंत ताणू नये, असे मला वाटते.

हे ही वाचलं का?

Back to top button