मनमाड; पुढारी वृत्तसेवा : अखेर दोन महिन्याच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर आज (दि.२९) सायंकाळी ७ नंतर मनमाड शहर परिसरात पावसाचे जोरदार आगमन झाले. सुरुवातीला पावसाच्या हलक्या सरी बरसल्या मात्र त्यानंतर पावसाचा जोर वाढला. रात्री ८ वाजेपर्यंत मुसळधार पावसाने शहर परिसराला झोडपून काढले. पावसाला सुरुवात होताच नेहमी प्रमाणे वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे संपूर्ण शहर अंधारात बुडाले होते. पावसाने अचानक येऊन सर्वाना सुखद धक्का दिला.
जोरदार पावसामुळे बाजारात आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. पावसामुळे करपू लागलेल्या पिकांना जीवदान मिळणार असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना देखील दिलासा मिळाला आहे
पावसाळा सुरु झाल्यानंतर सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावली होती. मात्र, त्यानंतर पाऊस गायब झाला होता. त्यामुळे पिके करूप लागल्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले होते. शिवाय चारा-पाण्याचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे. तब्बल दोन महिन्या नंतरशहर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे करपू लागलेल्या पिकांना जीवदान मिळाले. तर, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना देखील दिलासा मिळाला आहे.
आज जरी मुसळधार पाऊस झाला असला तरी, नदी, नाले अद्यापही कोरडे असून विहिरीनी देखील तळ गाठला आहे. दोन महिने पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून निघून गेला आहे. मात्र सलग जोरदार पाऊस झाल्यास किमान रब्बीचा हंगाम तरी व्यवस्थित होईल अशी शेकाऱ्यांनी भावना व्यक्त केली.
हेही वाचा;