नंदुरबार : बापरे ! एकाच वेळी तीन अस्वलांचा हल्ला; तरुण रक्तात न्हावून निघाला | पुढारी

नंदुरबार : बापरे ! एकाच वेळी तीन अस्वलांचा हल्ला; तरुण रक्तात न्हावून निघाला

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : गुरांसाठी चारा आणायला शेतात गेलेल्या तरुणावर एकाच वेळी तीन अस्वलांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाच्या डोक्याचा बराचसा भाग ओरबाडून काढल्यामुळे तसेच डोळ्याला ही गंभीर दुखापत झाल्यामुळे तरुणाची प्रकृती चिंताजनक असून सुरत येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

तळोदा तालुक्यात आधीच बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. तळोदा शहराच्या चारही दिशेला जवळपास 12 ते 15 बिबट्यांचा वावर असून दिवसा व रात्री केव्हाही त्यांचे लोकांना दर्शन घडू लागले आहे. काही दिवसांपूर्वीच दलेलपूर भागात बिबट्याने हल्ला केल्यामुळे 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी एका शेतकऱ्याला जायबंदी केले. आठवडा उलटत नाही तोवरच बिबट्याच्या हल्ल्यात आणखी दोन जण जायबंदी झालेत. या घटनाक्रमामुळे तळोद्यातील रहिवासी आणि तळोदा मार्गे प्रवास करणारे वाहनधारक कमालीचे धास्तावले आहेत. बिबट्यांचा हा धुमाकूळ चालू असतानाच आता अस्वलांच्या हल्ल्याने खळबळ उडवली आहे. प्राप्त माहितीनुसार सातपुडा पर्वत रागेच्या पायथ्याजवळ असलेल्या अक्कलकुवा वन क्षेत्रातील नवलपुर येथील दिनकर वनकर वसावे वय ३८ वर्षे हा दिनांक 23 ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास मांझ्या वसावे यांच्या शेतात गुरांसाठी चारा घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी अचानकपणे अस्वलाने हल्ला करून डोक्याला व डोळ्यांना मोठ्या प्रमाणावर इजा करून गंभीर जखमी केले. जखमी झालेला तरुण जवळपास रक्ताने न्हाहून निघाला होता.

जखमीला तातडीने अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात आणून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. एका पाठोपाठ तीन अस्वल चालून आले होते मात्र सदैव म्हणून बचावलो, अशी माहिती त्या तरुणांकडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल ललित गवळी, वनपाल दत्ता महाले, वनरक्षक सचिन वाघ यांनी धाव घेत हल्ल्यात जखमी झालेल्या रुग्णाचा पंचनामा केला. त्यास नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात होते मात्र डोक्याची व डोळयाची गंभीर जखम लक्षात घेऊन त्याला पुढील उपचारासाठी सुरत सिव्हील हॉपीटला पाठविण्यात आले.

हेही वाचलंत का?

Back to top button