Beed crime news: चारित्र्याच्या संशयावरून डोक्यात दगड घालून पत्नीचा खून; पतीविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

Beed crime news: चारित्र्याच्या संशयावरून डोक्यात दगड घालून पत्नीचा खून; पतीविरोधात गुन्हा दाखल

गेवराई, पुढारी वृत्तसेवा : चारित्र्यावर संशय घेत पतीने झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा निर्घृण खून केला. ही घटना आज (दि.२५) पहाटे गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील परिसरात घडली. या घटनेनंतर पती स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला. आणि मी पत्नीच्या डोक्यात दगड घातल्याचे पोलिसांना सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी फिर्याद दिली असून पतीविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. (Beed crime news)

याबाबत सविस्तर वृत्त असे की, औरंगाबाद जिल्ह्यातील आखदवाडा (ता. पैठण) येथील समीर कादर शेख (वय ३५) हा पत्नी, दोन वर्षांची मुलगी व स्वतःच्या बहिणीसह चकलांबा (ता. गेवराई) येथे काही कामानिमित्त गुरूवारी (दि. २४) आले होते. काल रात्री हे कुटूंब झोपले होते. या दरम्यान शरामद उर्फ समीर शेख याने झोपेत असलेल्या पत्नी शबाना शेख (वय २७) हिच्या डोक्यात दगड घातला. आवाज ऐकून सोबतची बहिण व अन्य लोक जागे झाले. (Beed crime news)

समीर शेख याने बहिणीच्या मदतीने गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या पत्नी शबानाला जवळच्या एका खासगी रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात हजर होवून पत्नीच्या डोक्यात दगड घातल्याचे सांगितले. मला तिच्या चारित्र्यावर संशय होता. म्हणून मी हे कृत्य केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी शबानाला तत्काळ चकलांबा सरकारी रूग्णालयात दाखल केले.

मात्र, मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांनी बीडला घेवून जाण्यास सांगितले. त्यानुसार जखमी शबानाला बीड येथील जिल्हा रूग्णालयात दाखल केले. परंतु आज पहाटे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मयत घोषित केले. या प्रकरणात चकलांबा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनंता तांगडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी शरामद उर्फ समीर कादर शेख याच्याविरूध्द चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास एकशिंगे करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button