यशोमती ठाकूर : 'किरीट सोमय्यांना महाराष्‍ट्राची जनता गांभिर्याने घेते का?' - पुढारी

यशोमती ठाकूर : 'किरीट सोमय्यांना महाराष्‍ट्राची जनता गांभिर्याने घेते का?'

धुळे ; पुढारी वृत्तसेवा

भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांना महाराष्ट्रातली जनता गांभीर्याने घेते का? त्यांच्यावर काय वक्तव्य करायचे, एखाद्याला अशा प्रकारची बोलण्याची त्यांना सवय असते, असे म्‍हणत राज्याच्या महिला आणि बाल कल्याण विभागाच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी किरीट सोमय्या यांची आज (सोमवार) धुळ्यात खिल्ली उडवली.

राज्याच्या मंत्री यशोमती ठाकूर या विविध कार्यक्रमांच्या निमित्‍ताने धुळ्यात आल्‍या होत्‍या. यावेळी त्यांच्या समवेत आमदार कुणाल पाटील, आमदार मंजुळाताई गावित, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांसमवेत संवाद साधला. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीकास्त्र सोडताना राज्यातली जनता त्यांना गंभीरतेने घेत नसल्याची टीका त्यांनी केली.

मंत्री ठाकूर यांनी आज नवाब मलिक यांना पाठिंबा दर्शवला

अंमली पदार्थ प्रकरणात मंत्री नवाब मलिक व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या रंगलेल्या आरोप प्रत्यारोप प्रकरणात मंत्री ठाकूर यांनी आज नवाब मलिक यांना पाठिंबा दर्शवला आहे.

त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले की, राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्याकडे कोणतेही पुरावे असल्याशिवाय ते बोलत नाहीत, असे आमचे निरीक्षण आहे.

ते कोणतेही वाक्य विचारपूर्वक वापरतात. त्यामुळे त्यांच्याकडे पुरावे असल्याशिवाय ते बोलणार नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडी मंत्री नवाब मलिक यांच्या समवेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार शेतकरी आणि जनतेच्या हिताचा विचार करून काम करीत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे नेते बेछूट आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. देशात महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

खाद्यतेल आणि इंधनाचे दर वाढत आहेत. यावर आळा घालण्याची जबाबदारी केंद्रातील सरकारची आहे. मात्र त्यावर मार्ग काढण्याऐवजी ते दिशाभूल करून मूळ विषयाला फाटा देत आहेत.

2019 च्या पूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये देशात स्फोटके आल्याचा आरोप झाला. या स्फोटक प्रकरणांमध्ये तपासात काय झाले, त्याचप्रमाणे यासंदर्भात कुणाच्या सहकार्याने संबंधित व्यक्ती बाहेर गेले, हे जगाने पाहिले आहे.

त्यामुळे शंभर टक्के शंभर वेळेस कोणीही खोटे बोलू शकत नाही. कधी तरी खोटे बोलण्याची सवय उघड होतेच, असा टोला देखील मंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी भारतीय जनता पार्टीला लगावला.

राज्य शासनाचे विविध विभाग एकाच छताखाली आणून महिला व बालकांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळवून द्यावा. यासाठी महिला व बाल भवनचे काम तातडीने मार्गी लावावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

कोविड काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना धनादेशाचे वितरण

मंत्री ॲड. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आज (सोमवार) जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात महिला व बालविकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळाचा आढावा तसेच कोविड काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार कुणाल पाटील,

आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी, पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, महिला व बालविकास विभागाचे सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर पगारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंतराव भदाणे,

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एम. एम. बागूल, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंत भदाणे आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री ॲड. ठाकूर यांच्या हस्ते कोविड काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, जिल्हा वार्षिक योजनेतून महिला व बालविकास विभागासाठी तीन टक्के निधी उपलब्ध होणार आहे. या निधीतून महिला व बाल भवन साकारावयाचे आहे. त्यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तातडीने सुरू करावी. महिला व बालभवनाबरोबरच अंगणवाडींसाठी स्वतंत्र इमारतीचे बांधकाम करावे.

‘एमआरईजीएस’च्या माध्यमातून अंगणवाडी इमारती बांधता येतील. त्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. अंगणवाडी इमारतीच्या भिंती बोलक्या कराव्यात.

त्यासाठी भिंतीवर जनजागृतीपर चित्रे, संदेश काढावेत. जेणेकरून अशा अंगणवाड्यांमधून उद्याचे चांगले नागरिक घडू शकतील. त्यासाठी जिल्हा परिषद व महानगरपालिकेने आतापासूनच नियोजन करावे, अशाही सूचना मंत्री ॲड. ठाकूर यांनी दिल्या.

मिशन वात्स्यल्य अभियान प्रभावीपणे राबवावे. ‘कोविड- 19’ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या नियमितपणे संपर्कात राहून त्यांच्या अडचणी जाणून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा. याबरोबरच ‘कोविड- 19’ मुळे पती गमावलेल्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे लाभ तातडीने मिळवून द्यावेत.

पीएम केअर निधीसाठी धुळे जिल्ह्यातील प्रस्ताव तातडीने सादर करावेत. माता व बालमृत्यू होणार नाहीत, अशी दक्षता महिला व बालविकास विभागाने घ्यावी. प्रत्येक शासकीय कार्यालय, खासगी कंपनीच्या कार्यालयात विशाखा समिती गठित झाल्याची खात्री करावी.

त्यासाठी जनजागृती मोहीम राबवावी. महिलांसाठी स्वच्छता गृहे बांधावीत. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस दलाने नावीण्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असेही मंत्री ॲड. ठाकूर यांनी सांगितले.

स्थलांतरीत होणाऱ्या मजुरांबरोबर त्यांची बालकेही स्थलांतरीत होतात. या मुलांची माहिती संकलित करून शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. महिला व बालविकासाशी निगडित विविध समित्यांची नियमितपणे बैठक घेवून जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा.

पालक गमावलेल्या बालकांशी संवाद

यावेळी मंत्री ॲड. ठाकूर यांनी महिला व बालविकास, महिला आर्थिक विकास महामंडळ, सखी वनस्टॉप सेंटर, माता- बालमृत्यू, बचत गटांच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य, कारागृहातील बंदिवान महिला आदींचा सविस्तर आढावा घेतला. पालक गमावलेल्या बालकांशी संवाद

यावेळी मंत्री ॲड. ठाकूर यांनी ‘कोविड- 19’ मुळे पालक गमावलेल्या बालकांशी संवाद साधला. त्यांची आपुलकीने विचारपूस केली. राज्य शासन तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. काही अडचणी असतील, तर जिल्हाधिकारी किंवा माझ्याशी थेट संवाद साधावा, असेही त्यांनी सांगितले.

Back to top button