

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात उद्योगांचा अधिक विकास करून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करत जिल्ह्यातील तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देण्यासाठी आपला प्रयत्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी भवनात भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन भुजबळ व विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी ना. छगन भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यात नाशिक पर्यटन, कृषी, मेडिकल टुरिझमला अधिक वाव आहे. यापुढील काळात आयटी हबसह अनेक उद्योग वाढवण्यासाठी प्रयत्न करून नोकरीच्या संधी निर्माण करण्यात येतील. तसेच राज्य शासनाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव या माध्यमातून ७५ हजार शासकीय नोकऱ्या देण्याचा महाराष्ट्र शासनाचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, राष्ट्रवादीच्या वतीने तरुणांना रोजगारासह, स्वयंम रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री स्वयंम रोजगार योजनेच्या माध्यमातून स्ट्रीट फूड वाहनांचे वाटप करण्यात आले आहे. तरुणांना रोजगारासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातील. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक पदाधिकाऱ्यांची कमिटी तयार करून महापुरुषांच्या जयंतीनिमित्त वर्षभर रोजगार मेळाव्याचे उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार देवीदास पिंगळे, आमदार दिलीप बनकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, नाना महाले, जिल्हा कार्याध्यक्ष गोरख बोडके, विष्णूपंत म्हैसधुणे, डॉ. शेफाली भुजबळ, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजूरकर, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष योगिता आहेर, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
समीर भुजबळ यांचे यशस्वी नियोजन
नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी भव्य नोकरी महोत्सवाचे यशस्वी नियोजन केले. गेल्या 15 दिवसांपासून चोख पद्धतीने नियोजन करून जिल्हाभरात याबाबत प्रचार आणि प्रसार करण्यासाठी यंत्रणा राबविली. सुमारे साडेआठ हजारांहून अधिक तरुणांनी नोंदणी केली, तर तीन हजारांहून अधिक तरुणांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. नोकरी महोत्सवात ५० हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या. नोकरी महोत्सवासाठी जॉब फेअर इंडिया या कंपनीच्या वतीने सहकार्य करण्यात आले.