नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेला गती; ना. पवार आज घेणार आढावा | पुढारी

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेला गती; ना. पवार आज घेणार आढावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्याच्या सत्तेत सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बहुचर्चित नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गात लक्ष घातले आहे. ना. पवार हे मंगळवारी (दि.८) व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे प्रकल्पाचा आढावा घेणार आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि.९) मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे वर्षभरापासून साइड ट्रॅक झालेल्या या प्रकल्पाला पुन्हा एकदा गती मिळणार आहे.

राज्याच्या सुवर्णत्रिकोणातील नाशिक व पुणे या शहरांना सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे. २३२ किमीच्या दुहेरी लोहमार्गासाठी नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यातील जमीन अधिग्रहीत करण्यात येत आहे. नाशिक व सिन्नर या तालुक्यातील २२ गावांतील सुमारे २८२ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन वित्तमंत्री पवार यांनी स्वत: या प्रकल्पात लक्ष घालताना दर पंधरा दिवसाला आढावा घेत होते. परंतु, गेल्या वर्षी जूनमध्ये राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना-भाजप महायुती सरकारमध्ये हा प्रकल्प थंड बस्त्यात पडला होता.

पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाचे काम पुन्हा एकदा दृष्टिक्षेपात आले आहे. नाशिक-पुणेबाबत पवार हे मंगळवारी (दि.८) आढावा घेणार आहे. त्यानंतर बुधवारी (दि.९) मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे.

नाशिकचे दर घोषित नाही

जिल्हा प्रशासनाने नाशिक व सिन्नर या दोन्ही तालुक्यांतील प्रकल्पांतर्गत गावांमध्ये सर्वेक्षण पूर्ण केले आहे. सिन्नरमधील १७ गावांचे दर यापूर्वीच प्रशासनाने घाेषित केले आहे. मात्र, सत्ता बदलानंतर नाशिकमधील पाच गावांचे दर घोषित करणे प्रशासनाने टाळले होते. प्रकल्पाचे काम करणाऱ्या महारेलने निधीचे कारण देत हात वर केले होते. परंतु, सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर महारेलने निधी तुटवड्याचे पत्र मागे घेतले होते.

प्रकल्प दृष्टिक्षेपात

– रेल्वेमार्गाची लांबी २३२ किलोमीटर

– नाशिक-पुणेदरम्यान दुहेरी विद्युतमार्ग

– रेल्वेचा वेग प्रतितास २०० किलोमीटर

– प्रवासाचा कालावधी पावणेदाेन तासावर येणार

– प्रकल्पात १८ बोगदे, ४१ उड्डाणपूल, १२८ भुयारी मार्ग

– नाशिक, नगर, पुण्याच्या विकासाला मिळणार

Back to top button