

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भयमुक्त नाशिक'साठी पाेलिस प्रशासन सरसावले असून, सराईत व धोकेदायक गुन्हेगार गजाआड करण्यासह ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले-मुली, विदयार्थी यांच्या सुरक्षेस प्राधान्य दिले जात आहे. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करून शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी मोक्का, एम.पी.डी.ए. तसेच इतर प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे.
शहरातील अवैध व्यवसायांना लगाम घालण्याकरिता अंमली पदार्थविरोधी पथक, गुंडाविरोधी पथक, खंडणीविरोधी पथक, दरोडा व शस्त्र विरोधी पथक इ. पथके तयार करून अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात येत आहे. आयुक्त शिंदे यांनी पोलिस ठाण्यांच्या मूल्यांकनासह प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मूल्यांकनाला सुरुवात केली आहे. यासह नागरिकांच्या संवादातून गुन्हेगारांची माहिती संकलित करून त्यांच्यावरील प्रतिबंधात्मक कारवाईत वाढ करण्यासह सराइतांवर थेट मोक्का व एमपीडीए अंतर्गत कारवाईचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, नाशिकरोड वाहन तोडफोडीच्या गुन्ह्यात मोक्का प्रस्तावित करत गुन्हेगारांना आता कठोर कारवाई होणार असल्याचा सूचना वजा इशारा आयुक्तालयाने दिला आहे. यासह चौकसभांच्या माध्यमातून नागरिकांद्वारे मिळणारी गुन्हेगारी कृत्याची खबर घेत संशयितांची धरपकड सुरू झाल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.
सात महिन्यांतील लेखाजोखा
– ५१ संशयित तडीपार, ४ गुन्ह्यांत ४५ संशयितांना मोक्का, ७ सराइतांवर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाद्वारे १५२ मुला-मुलींसह ७१३ बेपत्ता व्यक्तींचा शोध पूर्ण.
– फसवणूक व विश्वासघात प्रकरणांत १८,४०,५०० रुपयांचा मुद्देमाल उघड-३०० सायबरदूतांना प्रशिक्षण, टोइंगऐवजी ई-चलानाद्वारे कारवाई, चौकसभांतून नागरिकांशी थेट संवाद साधून गुन्हेगारीवर नियंत्रण.
-दारूबंदी अधिनियमांतर्गत २१४ गुन्हे, ३२,३,८०९ रुपयांचा मुद्देमाल जप्त, जुगार प्रतिबंध अधिनियमांतर्गत ७० गुन्हे, ५,२१,६१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त, ३०,२५,३८४ रुपयांचा अवैध गुटखा, १२,४३,८२२ रुपयांचे अमली पदार्थ