नाशिक : जिल्ह्यात राबविले जाणार "मेरी मिट्टी मेरा देश' अभियान
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्याने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘मेरी मिट्टी मेरा देश’ हे अभियान संपूर्ण देशभरात राबविले जात आहे. नाशिक जिल्ह्यातही जिल्हा परिषदेच्या वतीने दि. 9 ते 20 ऑगस्ट या कालावधीत ते राबविले जाणार आहे. अभियानाच्या अंमलबजावणीसाठी तालुकास्तरावर गटविकास अधिकारी सर्व यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
या अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर व तालुका स्तरावर दि. 9 ते 20 ऑगस्ट 2023 या कालावधीत उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये दिशाफलक उभारणे, स्वातंत्र्य सैनिक, वीरांना वंदन, पंचप्राण शपथ घेणे, ध्वजारोहण कार्यक्रम, माती कलशामध्ये गोळा करणे – प्रत्येक गावातील आणलेली माती एका कलशामध्ये गोळा करून या कलशावर तालुका, जिल्हा व राज्याचे नाव टाकून हा मातीचा कलश दि. 27 ते 30 ऑगस्ट 2023 या दरम्यान पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी दिल्ली येथे नेण्यात येणार आहे.
याचबरोबर वसुधावंदनाचा कार्यक्रम ग्रामपंचायत स्तरावर असलेल्या अमृत सरोवराच्या ठिकाणी अथवा अमृत सरोवराच्या परिसरात आयोजित करण्यात येत आहे. ग्रामपंचायत स्तरावर अमृत सरोवर उपलब्ध नसल्यास इतर पाणी साठ्याच्या ठिकाणी, ग्रामपंचायत किंवा शाळा परिसरामध्ये वृक्षलागवड करण्यात येणार आहे. त्यानुसार वसुधावंदन या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर 75 देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, संपूर्ण जिल्ह्यातल्या 1,388 ग्रामपंचायतींमध्ये एकूण 1,04,100 देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या वसुधावंदन उपक्रमामध्ये वृक्षलागवड करावयाची असल्याने वृक्षलागवड महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करण्यात येणार आहे.
भविष्यात प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर अमृत वाटिका तयार होणार, वसुधावंदन उपक्रमांतर्गत वृक्षलागवड व शिलाफलक कामांची एकूण अंदाजपत्रकीय रक्कम 1,70,436 आहे.
गावात सेल्फी पॉइंट संख्या, शाळा-महाविद्यालये यांच्यामार्फत चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचबरोबर प्रभातफेरी, सायकल / मोटारसायकल रॅली इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वेळापत्रक
1. दि. 9 व 10 ऑगस्ट 202३ अमृत सरोवर किंवा गावात उपलब्ध जलाशयाच्या ठिकाणी 75 देशी प्रजातींच्या रोपांची लागवड करणे.
2. दि. 11 ऑगस्ट 2023 रोजी ग्रामपंचायत संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या समन्वयाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करणे.
3. दि. 12 ऑगस्ट 2023 रोजी प्राथमिक / माध्यमिक शाळा, महाविद्यालय यांच्यामार्फत प्रभात फेरी, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
4. दि. 13 ऑगस्ट 2023 रोजी गावात सेल्फी पॉइंट तयार करून सेल्फी घेण्याचे अभियान राबविणे.
5. दि. 14 ऑगस्ट 2023 रोजी ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर बाबींचा निपटारा करण्यासाठी मोहीम राबविणे.
6. दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी ध्वजवंदन, राष्ट्रगीत व राज्यगीत गायन, वीरांचा सन्मान करणे.
7. दि. 16 ऑगस्ट 2023 रोजी ग्रामपंचायत स्तरावर QR Code द्वारे करवसुली मोहीम स्वरूपात राबविणे तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती कार्यालयात अभ्यागतांच्या वापरासाठी असलेले शौचालय स्वच्छता करण्याची विशेष मोहीम राबविणे.
‘मेरी मिट्टी मेरा देश’ या अभियानाचे सूक्ष्म नियोजन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येणार असून, जिल्ह्यात यशस्वीपणे उपक्रम राबविण्यासाठी संबंधित विभागप्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने या उपक्रमात सहभाग घ्यावा.
आशिमा मित्तल,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.नाशिक
हेही वाचा :