नाशिक : जिल्ह्याच्या पूर्व भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा | पुढारी

नाशिक : जिल्ह्याच्या पूर्व भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

परिसरात या हंगामात निम्मा पावसाळा संपल्यात जमा असून, अद्याप पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाचे थैमान चालू असताना जिल्ह्याच्या काही भागांत मात्र बळीराजा जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

लासलगाव व परिसरात गेल्या वर्षी 19 जुलैपर्यंत 409 मि.मी. इतका पाऊस झाला होता, तर यंदा १९ जुलैपर्यंत केवळ 167 मि. मी. इतका पाऊस झाला असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल 242 मिलिमीटर इतका कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे अशीच परिस्थिती राहिल्यास गंभीर परिस्थितीला बळीराजाला सामोरे जावे लागणार आहे. यंदा लासलगाव परिसरात 24 जूनला 25 मिमी, तर 26 जूनला 23 मिमी हे दोन दमदार पाऊस वगळता पाऊस झालेला नाही. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस म्हणजे 902 मिलिमीटर इतका पाऊस झाला होता.

जिल्ह्याच्या पूर्व भागात रोज पावसाची वाट बघावी लागत आहे. शेतात थोडेफार पेरलेले आहे ते वाचवण्यासाठी दुबार पेरणीपासून वाचवण्यासाठी पावसाची गरज आहे. या कमी पावसामुळे येणाऱ्या खरीप पिकाला मोठा फटका बसणार असून सोयाबीन, मका, उडीद, मूग या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास येणाऱ्या कांद्याला व टोमॅटोलाही याचा फटका बसू शकतो. पुनर्वसू नक्षत्र जवळपास संपले असून, येणाऱ्या दोन दिवसांत पुष्य नक्षत्रास सुरुवात होणार आहे. त्यामुळे हे नक्षत्र चांगले असल्यास बळीराजावर आलेले संकट थोड्याफार प्रमाणात दूर होऊ शकते.

या परिस्थितीमुळे परिसरातील जनावरांचा चाऱ्याचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. दमदार पाऊस न झाल्यामुळे विहिरी व बोअरवेल यांना पाणी नसल्याने जनावरांचा व पिण्याचा प्राण्याचा प्रश्न मोठी गंभीर समस्या उभी राहिली आहे. त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. त्याच्या डोळ्यातील पाणी आटले तरी पावसाची काही कृपा होताना दिसत नाही. 

हेही वाचा :

Back to top button