Chhagan Bhujbal : पहिल्याच बैठकीत भुजबळांनी दिले ई सुविधा करण्याचे आदेश | पुढारी

Chhagan Bhujbal : पहिल्याच बैठकीत भुजबळांनी दिले ई सुविधा करण्याचे आदेश

नाशिक पुढारी वृत्तसेवा

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची जबाबदारी कॅबिनेट मंत्री भुजबळांवर आल्यानंतर त्यांनी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत आढावा घेतला. त्यानंतर संबंधितांना अंमलबजावणी करण्याचे आदेश देखिल दिले. यामध्ये ई सुविधा प्रणाली सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी विभागामार्फत दोन नवीन ॲप सुरु करण्यात येणार असल्याची माहीती सचिवांनी दिली.

या बैठकीला विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्यासह विभागाचे सहसचिव सतीश सुपे, सहसचिव तातोबा कोळेकर, उपसचिव नेत्रा मानकामे, उपसचिव राजश्री सारंग, वित्तीय सल्लागार भगवान घाडगे आदी अधिकारी उपस्थीत होते.

या बैठकीमध्ये राज्यातील शिवभोजन केंद्रांची सद्य:स्थिती, त्यांचे निधी वितरण, मराठवाडा व विदर्भातील 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण, ‘आनंदाचा शिधा’ उपक्रमामध्ये राज्यभरात करण्यात आलेले शिधा वितरण, शासकीय धान्य गोदामातील अन्न धान्याच्या हाताळणुकीसाठी हमाल कंत्राट निश्चितीची प्रक्रिया, विभागाच्या अधिपत्याखालील पदभरतीबाबतची कार्यवाही, किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम 2022-23 मधील धानाकरिता प्रोत्साहनपर राशी अंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना देण्यात आलेला निधी, तृतीयपंथी नागरिकांना शिधापत्रिका वितरण, लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत पोषणतत्व गुणसंवर्धित तांदूळ (फोर्टीफाईड तांदूळ) वितरण तसेच पिएम- वाणी योजना या विषयांचा आढावा घेण्यात आला.

सध्या ई-ऑफिसच्या माध्यमातून विभागाचे पूर्ण कामकाज केले जात असून जनतेला वितरण व्यवस्थेतील सर्व सोयीसुविधा सहजतेने उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने विभागामार्फत दोन नवीन ॲप सुरु करण्यात येणार आहेत. याबाबतची सविस्तर माहिती सचिवांनी यावेळी दिली.

छगन भुजबळ मंत्री,अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, महाराष्ट्र राज्य

Back to top button