दहावी-बारावीची आजपासून पुरवणी परीक्षा, नाशिक विभागात १३ हजार ४५९ परीक्षार्थी | पुढारी

दहावी-बारावीची आजपासून पुरवणी परीक्षा, नाशिक विभागात १३ हजार ४५९ परीक्षार्थी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेला मंगळवारी (दि. १८) प्रारंभ होत आहे. नाशिक विभागातून इयत्ता दहावीचे ७ हजार ९६७, तर इयत्ता बारावीचे ५ हजार ४९२ परीक्षार्थी आहेत. ३६ केंद्रांमध्ये इयत्ता दहावीची, तर २९ केंद्रांमध्ये इयत्ता बारावीची लेखी परीक्षा होणार आहे.

इयत्ता दहावी व बारावी लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनुत्तीर्ण तसेच श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेचे वेध लागल होते. यंदाही राज्य शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पुरवणी परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. त्या माध्यमातून नियमित, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली आहे.

इयत्ता बारावीची सर्वसाधारण व द्विलक्षी विषयांची परीक्षा दि. १८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत, तर व्यवसाय अभ्यासक्रमांची परीक्षा दि. १८ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. तसेच प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा ५ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. दहावीची पुरवणी परीक्षा दि. १८ जुलै ते १ ऑगस्ट या दरम्यान होणार आहे. तर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.

दरम्यान, विभागात बारावी विज्ञान शाखेचे १ हजार ८७२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. कला शाखेचे २ हजार ६५१, वाणिज्य शाखेचे ७६६, व्यावसायिक अभ्यासक्रमाचे २०२ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. नाशिक जिल्ह्यातून आयटीचा एकमेव परीक्षार्थी असणार आहे.

जिल्हानिहाय विद्यार्थी (दहावी)

जिल्हा-केंद्र-विद्यार्थी

नाशिक-१५-३,४७९

धुळे-५-३,१४३

जळगाव-१४-१,०७६

नंदुरबार-२-२६९

एकूण-३६-७,९६७

——- ——-

जिल्हानिहाय विद्यार्थी (बारावी)

जिल्हा-केंद्र-विद्यार्थी

 

नाशिक-१३-४,०७७

 

धुळे-४-५४६

 

जळगाव-८-६५५

 

नंदुरबार-४-२१४

 

एकूण-२९-५,४९२

Back to top button