अजित पवार अर्थमंत्री असले तरी, फडणवीसांकडूनच फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाणार : गुलाबराव पाटील | पुढारी

अजित पवार अर्थमंत्री असले तरी, फडणवीसांकडूनच फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाणार : गुलाबराव पाटील

जळगाव: पुढारी वृत्तसेवा

महाआघाडी सरकारमध्ये निधीचे असमान वाटप केले जात होते. मात्र, आता मागच्या सरकारप्रमाणे होणार नाही. आता अर्थमंत्री अजित पवार असले तरी फाईल उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार आहे. त्यामुळे संतुलित काम होईल, गडबड होणार नाही, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

गुलाबराव पाटील यांनी जळगावातील शालेय कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुती सरकारमधील कामकाजाची माहिती दिली. मागच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. पण त्यांना प्रशासनाचा फारसा अनुभव नव्हता त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थ खाते आणि उपमुख्यमंत्रीपद अजित पवारांकडे असल्याने निधी मिळण्याबाबत आमदारांना अडचणी येत होत्या. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याने शिंदे गटाला वाटा सारखाच मिळेल. त्यात कुठल्याही प्रकारची गडबड होणार नाही, याची खात्री आम्हाला आहे, असे ते म्हणाले. अर्थ खाते अजित पवारांकडे असले तरी आपण मुख्यमंत्री असल्याने आमदारांना काहीच अडचणी येणार नाहीत. अर्थ खात्याकडे येणारी प्रत्येक फाईल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नजरेखालून जाणार आहे. त्यामुळे मागच्या काळात जे असंतुलित काम झाले होतं, ते या काळात होणार नाही. त्यामुळे मागच्या काळात जे गैरसमज झाले होते, ते कामाच्या रूपाने बाहेर येतील, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

…तर मी गुरुजी झालो असतो

शालेय कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मिश्किल टिप्पणीही केली. ते म्हणाले, मला दहावीत ५६ टक्के गुण मिळाले होते. त्यावेळी ५५ टक्क्यांवर डीएडचा मेरिट क्लोज झाला होता. त्यामुळे माझा नंबर डीएडलाही लागला होता. मी डीएड केले असते तर मीही ‘गुलाब गुरुजी’ नावाने ओळखलो गेलो असतो, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

हेही वाचा :

Back to top button